१५ ऑगस्टला ट्रम्प-पुतीन भेट! करार झाला तर भारताला दिलासा?

वॉशिंग्टन – भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून भारताला एकूण ५० टक्के आयात कर लावणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प १५ ऑगस्ट रोजी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेणार आहेत. रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याच्या दृष्टीने ही भेट होत असून या भेटीत रशिया आणि अमेरिका यांच्यात करार होणार आहे . हा करार झाला तर त्याचा फायदा भारताला होऊ शकतो. ट्रम्प यांचा रशियाचे तेल घेतल्याचा राग कमी होईल आणि भारतावर या कारणाने लादलेला २५ टक्के अतिरिक्त आयात कर पूर्णपणे हटवली जाण्याची शक्यता आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर पोस्ट करून माहिती दिली की, माझी आणि पुतीन यांची बहुप्रतिक्षित बैठक पुढील शुक्रवारी, १५ ऑगस्ट रोजी अमेरिकेतील अलास्का राज्यात होईल. त्याबाबत अधिक तपशील नंतर दिला जाईल. त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलतानाही सांगितले की, राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना शांतता हवी आहे आणि झेलेन्स्की यांनाही आता शांतता हवी आहे. सर्व पक्ष युद्धबंदी कराराच्या जवळ आहेत. या बैठकीमुळे साडेतीन वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष संपुष्टात येऊ शकतो. यात दोन्ही देशांना महत्त्वाचे प्रदेश एकमेकांना सोपवावे लागू शकतात. झेलेन्स्की यांनी काही गोष्टी मान्य करण्याची वेळ आली आहे. मात्र झेलेन्स्की यांनी आज पुन्हा म्हटले की युक्रेनचा एक इंच भूभाग मी देणार नाही . त्यामुळे युध्दबंदी होते का याबाबत साशंकताच आहे.

ट्रम्प यांनी ही घोषणा केल्यानंतर त्यांच्या पुतीन समवेतच्या भेटीत युक्रेन युद्धासह इतर कोणत्या विषयांवर चर्चा होते याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून त्यांनी रशिया व युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्याची इच्छा अनेकदा बोलून दाखवली. युद्धबंदीसाठी त्यांनी दोन्ही देशांना आधी ५० व नंतर १० दिवसांचा अवधी दिला होता. या दोन्ही मुदती संपल्या आहेत. मात्र, युद्धबंदीसाठी पुतीन हे ट्रम्प यांच्याशी चर्चा करायला तयार नव्हते. आता ते तयार झाल्याने अमेरिकेच्या भूमीवर दोन नेत्यांची पहिल्यांदाच भेट होणार आहे.

२०१७ ला जर्मनीच्या हॅम्बर्ग येथील जी-२० परिषदेच्या वेळी दोघांची बैठक झाली होती. त्यानंतर व्हिएतनाम आणि हेलसिंकी येथेही दोघे भेटले होते. २०१९ मध्ये जपानमध्ये झालेल्या जी-२० परिषदेदरम्यान दोघे भेटले, तेव्हा ट्रम्प यांनी आमच्या निवडणुकीत हस्तक्षेप करू नका, असे पुतीन यांना सुनावले होते.

भारत-पाकिस्तानमध्येही युद्धबंदी केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. जगातील सहा युद्धे संपवल्याचाही त्यांचा दावा आहे. आता त्यांना रशिया व युक्रेन युद्धात निर्णायक भूमिका पार पाडायची आहे. त्यांनी युक्रेनला या युद्धात शस्त्रास्त्र पुरवठा केला आणि मग दबाव आणून या मदतीच्या बदल्यात युक्रेनची खनिजे ताब्यात घेण्याचा करार झेलेन्स्कीला करायला लावला . आता ते पुतिन यांना भेटणार आहेत. रशियाचे गुंतवणूक प्रतिनिधी दिमित्रे म्हणाले की काही राष्ट्र ही बैठक होऊ नये असा प्रयत्न पूर्ण ताकदीने करत आहेत. दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी दिली आहे. तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या अखेरीस एससीओ परिषदेसाठी चीनला जाणार आहेत. या घडामोडींनंतर अमेरिकेची भारताबाबतची भूमिका बदलते का याकडे भारतीयांचे लक्ष असेल.