AC Temperature Rule | देशभरातील एअर कंडिशनर (AC) वापरासाठी नवे नियम लागू करण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी याबाबतची माहिती दिली आहे. लवकरच देशभरात सर्व एसीसाठी तापमान 20 अंश सेल्सिअस ते 28 अंश सेल्सिअस या मर्यादेतच ठेवावे लागेल, अशी माहिती खट्टर यांनी दिली. म्हणजेच, कोणतेही एसी त्यापेक्षा थंड किंवा गरम ठेवता येणार नाही.
हा निर्णय ऊर्जा बचत, पर्यावरण रक्षण आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर घेतला गेला असून, यामुळे विजेचा वापर कमी होईल आणि ग्राहकांचे वीज बिल देखील कमी होण्याची शक्यता आहे. हे धोरण फक्त घरगुती व व्यावसायिक एसीपुरते मर्यादित नसून, वाहनांमधील एसी सिस्टमलाही लागू होणार आहे.
खट्टर म्हणाले, “हे एक प्रायोगिक पाऊल आहे. एसीसाठी ही मानक तापमान मर्यादा लागू केल्यास अत्यंत कमी तापमानामुळे होणाऱ्या अतिरिक्त विजेच्या वापरावरनियंत्रण मिळेल.” सध्या बाजारातील अनेक एसी युजर्सना तापमान 16°C ते 30°C पर्यंत सेट करण्याची मुभा देतात. मात्र, नव्या नियमांनुसार ही रेंज आता नियंत्रित केली जाणार आहे.
याआधी 2020 मध्ये ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी (BEE) ने सर्व स्टार-लेबल एसीसाठी 24°C तापमान बंधनकारक केले होते. तसेच, व्यावसायिक इमारतींमध्ये 24 ते 25 अंश सेल्सिअस दरम्यानचे तापमान राखण्याचे निर्देशही दिले गेले होते.
नवीन धोरणामुळे देशातील ऊर्जा वापर अधिक शिस्तबद्ध होईल, हवामान बदलाशी लढा देण्यास मदत होईल आणि नागरिकांचा एसी वापर अधिक जबाबदारीने होईल, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.
								
								
								
								
								
				
															
								
								
								
								
								
								








