Ahmedabad Plane Crash | विमान अपघाताची दुहेरी चौकशी होणार; 3 महिन्यांत अहवाल अपेक्षित, उच्चस्तरीय समिती स्थापन

Ahmedabad Plane Crash

Ahmedabad Plane Crash | अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या (Air India) ‘AI-171’ या बोइंग 787-8 विमानाला झालेल्या भयंकर अपघाताने (Plane Crash) देशभरात खळबळ माजली. या दुर्घटनेनंतर आता केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (Civil Aviation Ministry) या घटनेची दुहेरी चौकशी करणार असल्याचे जाहीर केले आहे.

यात Aircraft Accident Investigation Bureau तांत्रिक तपास करणार आहे, तर अपघाताच्या सर्व संभाव्य कारणांचा शोध घेण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन झाली आहे. ही समिती पुढील तीन महिन्यांत आपला अहवाल सादर करेल.

अपघात नेमका कसा घडला?

मंत्रालयाचे सचिव समीर कुमार सिन्हा यांनी सांगितलं की, विमानाने दुपारी 1:39 वाजता नियोजित वेळेनुसार अहमदाबादहून लंडनकडे उड्डाण केलं. पण काही सेकंदातच, 650 फूट उंचीवर पोहोचल्यानंतर विमान खाली येऊ लागलं आणि ‘मेडे कॉल’ जारी झाला. एअर ट्रॅफिक कंट्रोलला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. 1:40 वाजता, विमान विमानतळापासून फक्त 2 किमी अंतरावर मेघानीनगरमध्ये कोसळलं. हे विमान यापूर्वी पॅरिसहून दिल्ली आणि नंतर अहमदाबादला आलं होतं.

विमानात क्रू मेंबर्ससह 242 प्रवासी होते, त्यापैकी 241 जणांचा मृत्यू झाला. विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या मेसवर कोसळल्याने जमिनीवरील काही लोकांचेही निधन झाले, ज्यामुळे मृतांचा आकडा 270 वर पोहोचला. ब्लॅक बॉक्स सापडला असून, हा ब्लॅक बॉक्स तपासात महत्त्वाची माहिती देईल. सध्या गुजरातमध्ये डीएनए तपासणी आणि प्रोफाइलिंगचं काम सुरू आहे.

सरकारची तातडीची पावलं

नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, एअर इंडियाच्या 34 बोइंग 787 विमानांच्या ताफ्याची कसून तपासणी होणार आहे. यापैकी 8 विमानांची तपासणी आधीच झाली आहे. “ब्लॅक बॉक्समुळे विमान कोसळण्यापूर्वी काय घडलं, हे स्पष्ट होईल,” असं ते म्हणाले. मृतांच्या कुटुंबीयांना विम्याची रक्कम लवकर मिळावी, यासाठीही एअर इंडियाला निर्देश देण्यात आले आहेत.

या अपघाताचा तपास दोन पातळ्यांवर होईल. पहिली म्हणजे AAIB ची तांत्रिक तपासणी, ज्यात डिजिटल फ्लाईट व्हिडिओ रेकॉर्डरचं डीकोडिंग आणि वैद्यकीय तसंच फॉरेन्सिक तज्ञांचा समावेश असेल. दुसरी म्हणजे उच्चस्तरीय समिती, जी अपघाताच्या सर्व संभाव्य कारणांचा तपास करेल. या समितीत केंद्रीय गृह सचिव, भारतीय हवाई दल, गुजरात गृह विभाग आणि आपत्कालीन प्रतिसाद प्राधिकरणाचे तज्ञ असतील. ही समिती 16 जून 2025 रोजी पहिली बैठक घेईल.