नवी दिल्ली – अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघाताच्या (Ahmedabad Air India plane crash) तपासाबाबत विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू (Ram Mohan Naidu) यांनी आज राज्यसभेत माहिती दिली. ते म्हणाले की, अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील (Black box) संपूर्ण माहिती विमान अपघात तपास संस्था (AAIB) ने यशस्वीरित्या उकल केला आहे. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार तपासाची प्रक्रिया सुरू असून, यामध्ये संबंधित तज्ज्ञ व आंतरराष्ट्रीय संस्थांचा सहभाग आहे.
ते पुढे म्हणाले की, ब्लॅक बॉक्स म्हणजे फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस (Cockpit voice) रेकॉर्डरमधून मिळणाऱ्या माहितीला तपासात महत्व असते. यापूर्वी अशा प्रकरणांमध्ये ब्लॅक बॉक्सला नुकसान झाल्यास तो मूळ उत्पादक देशात पाठवून त्यातून माहिती मिळवली केली जायची. मात्र, यावेळी भारताने अपघातग्रस्त ब्लॅक बॉक्समधून देशातच यशस्वीरित्या सर्व माहिती प्राप्त केली आहे. विमान अपघात तपास संस्थेने फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरमधून मिळालेली माहिती एकत्र करून प्राथमिक अहवाल तयार केला.हा प्राथमिक अहवाल सरकारकडे सादर करण्यात आला आहे. यामध्ये काय घडले यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्यासाठी अंतिम अहवालची वाट पाहणे आवश्यक आहे.