अहमदाबाद विमान अपघातातून वाचला; धक्क्यातून सावरला नाही

Ahmedabad plane crash survivor not recovered from shock

अहमदाबाद- अहमदाबाद विमान दुर्घटनेत (Ahmedabad plane crash) आश्चर्यकारकरित्या बचावलेला एकटा प्रवासी विश्वास कुमार (Vishwas Kumar) हा अजूनही धक्क्यातून सावरलेला नाही, अशी माहिती विश्वासच्या चुलत भावाने दिली. विमान अपघाताची ती घटना त्याला अजूनही अस्वस्थ करते. त्याला या अपघाताचा आणि भावाच्या मृत्यूचा मोठा धक्का बसला आहे. तो ब्रिटिश नागरीक असून त्याचे नातेवाईक त्याला इंग्लंडमधून मोबाईलवर संपर्क साधतात. मात्र, विश्वास त्यांच्याशी फोनवर फारसा बोलत नाही, असेही विश्वासच्या चुलत भावाने सांगितले.

तो पुढे म्हणाला की, विश्वास रात्री अचानक झोपेतून उठून बसतो. त्यानंतर त्याला झोपच लागत नाही. त्याला सतत त्या घटनेची आठवण होते. तो एकटाच अंथरुणावर बसून राहतो. त्यामुळे त्याला मानसोपचारतज्ज्ञाकडे (Psychiatrist) नेण्यात आले. तिथेही त्याचावर उपचार सुरू आहेत. सध्या लंडनला परत जाण्याविषयी त्याचा कोणताही विचार नाही. तसेच अजूनही त्याचे विमान प्रवास करण्याचे धाडस होत नाही.