अहमदाबाद विमान अपघात: ‘फ्युएल स्विच’च्या त्रुटीबाबत 7 वर्षांपूर्वीच देण्यात आला होता इशारा, दुर्घटनेसाठी ठरले कारण?

Ahmedabad Plane Crash

Ahmedabad Plane Crash | अहमदाबादमधील गेल्या महिन्यातील एअर इंडियाच्या भीषण विमान अपघाताचा (Ahmedabad Plane Crash) तपास नव्या वळणावर आला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने प्रसिद्ध (AAIB Report) केलेल्या प्राथमिक अहवालात ‘फ्युएल कंट्रोल स्विच लॉकिंग सिस्टिम’ या समस्येकडे लक्ष वेधले आहे. अपघाताचे नेमके कारण निश्चित नसले तरी इंधनपुरवठा बंद होण्याची शक्यता तपासण्यासाठी सखोल चौकशी सुरू आहे.

फ्युएल स्विचची भूमिका

फ्युएल कंट्रोल स्विच (Fuel Switch) हे कॉकपिटमधील लहान लिव्हर्स असून, हे इंजिनचा इंधनपुरवठा नियंत्रित करतात. उड्डाणानंतर लगेचच हे स्विच ‘कटऑफ’ स्थितीत गेल्याचे फ्लाइट डेटा रेकॉर्डरने दाखवले. कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरमध्ये वैमानिकांचा संवाद देखील याबाबत नोंदवला गेला आहे. या संवादामध्ये वैमानिक फ्युएल कंट्रोल स्विच अचानक बंद कसा झाला? याबाबत बोलताना दिसत आहेत.

7 वर्षांपूर्वीच दिला होता इशारा

यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने डिसेंबर 2018 मध्ये ‘बोइंग 737’ विमानांमधील काही फ्युएल कंट्रोल स्विच चुकीच्या पद्धतीने बसवले असल्याचा इशारा देणारी ‘स्पेशल एअरवर्थिनेस इन्फॉर्मेशन बुलेटिन’जारी केली होती. हे लॉकिंग फीचर स्विच अनवधानाने ‘रन’ स्थितीतून हलवण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी आहे.

जरी हे बुलेटिन ‘बोइंग 787’ साठी विशेष नव्हते, तरी सरकारी अहवालात म्हटले आहे की, लंडनला जाणाऱ्या विमानातील फ्युएल कंट्रोल स्विचची रचना आणि लॉकिंग यंत्रणा ‘बोइंग 737’ सारखीच होती. शिवाय, अहवालानुसार, एअर इंडियाने तपासकर्त्यांनासांगितले की, त्यांनी या लॉकिंग सिस्टिमची शिफारस केलेली तपासणी कधीच केली नाही, कारण FAA बुलेटिन केवळ सल्लागार होते, अनिवार्य नव्हते.

विमानाचे थ्रॉटल मॉड्यूल 2019 आणि 2023 मध्ये बदलले, पण दोष नोंदला गेला नाही. फ्लाइट डेटा आणि यांत्रिक विश्लेषणानंतर अंतिम अहवालात लॉकिंग फीचरची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.