Home / देश-विदेश / Ahmedabad plane crash| अहमदाबाद अपघातातील बोईंग विमानांचे इंधन स्विच लॉक सुरक्षित; बोईंगचे स्पष्टीकरण

Ahmedabad plane crash| अहमदाबाद अपघातातील बोईंग विमानांचे इंधन स्विच लॉक सुरक्षित; बोईंगचे स्पष्टीकरण

Air India Finds No Fault In Boeing Fuel Switches

अहमदाबाद – गुजरातमधील अहमदाबाद (Ahmedabad plane crash) येथे १२ जून रोजी झालेल्या विमान अपघाताचा प्राथमिक चौकशी अहवाल आला आहे. या अहवालात इंजिनमधील इंधन स्विच लॉक सिस्टमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. मात्र, अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) आणि बोईंग (Boeing) कंपनीने इंधन स्विच लॉक पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा केला आहे.

एफएए आणि बोईंगने संयुक्तपणे जारी केलेल्या पत्रकानुसार, इंधन नियंत्रण स्विचची रचना आणि त्यातील लॉकिंग वैशिष्ट्ये सर्व बोईंग विमानांमध्ये सारखीच आहेत. यामध्ये कोणतीही गंभीर समस्या आढळलेली नाही. त्यामुळे कोणत्याही बोईंग विमानावर एअरवॉर्थिनेस निर्देश देण्याची गरज नाही. २०१८ मध्ये बोईंग ७८७ विमानाच्या इंधन स्विच लॉकिंग सिस्टममध्ये दोष असल्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, नंतर सुधारित डिझाइननुसार यंत्रणा विकसित करण्यात आल्याचे बोईंगने स्पष्ट केले आहे.

एअर इंडिया कंपनीनेही यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे की, बोईंगच्या सूचनेनुसार अहमदाबाद-लंडन मार्गावरील बोईंग ७८७-८ या विमानाच्या थ्रॉटल कंट्रोल मॉड्यूल (TCM) युनिटमध्ये २०१९ आणि २०२३ मध्ये दोनदा बदल करण्यात आले होते. या टीसीएममध्येच इंधन नियंत्रण स्विच बसवलेले असतात.

एएआयबीच्या १५ पानी अहवालात नमूद करण्यात आले आहे की, विमान उड्डाण घेतल्यानंतर एक पायलट दुसऱ्या पायलटला विचारतो तू इंधन स्विच का बंद केले?” यावर दुसरा पायलट उत्तर देतो की, मी इंधन स्विच बंद केलेले नाही. मात्र, उड्डाणानंतर इंधन स्विच रन स्थितीतून अचानक कट-ऑफ मध्ये गेले, असे तपास पथकाने अहवालात नमूद केले आहे. परंतु, इंधन स्विच बंद कसे झाले? याबाबत अहवालात कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. याच कारणामुळे इंधन स्विच लॉकच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.