Air India Express: गेल्याकाही दिवसांपासून विमानातील सुविधा, प्रवास सुरक्षा अशा अनेक गोष्टी चर्चेत आहेत. प्रवाशांच्या सुखरूप प्रवासासाठी विमान कंपन्यांकडून देखील विशेष काळजी घेतली जात आहे. यातच आता एका महिलेने विमानातच बाळाला जन्म दिल्याची माहिती समोर आली आहे.
मस्कतहून मुंबईकडे येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या (Air India Express) विमानात 35 हजार फूट उंचीवर एका थायलंडच्या महिला प्रवाशाने एका गोंडस बाळाला (Mid-Air Birth) जन्म दिला. एअरलाइनने यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे.
विमान कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरक्षित प्रसूती
एअर इंडिया एक्सप्रेसने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मुलाचा जन्म विमान कर्मचाऱ्यांच्या मदतीने झाला, तसेच प्रवाशांपैकी एक असलेल्या नर्सनेही यावेळी मदत केली.
“मस्कतहून मुंबईकडे येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात एका थायलंडच्या महिलेने हवेतच बाळाला जन्म दिला. बाळाच्या जन्मासाठी एअरलाईनच्या केबिन कर्मचाऱ्यांनी मदत केली, तसेच विमानात असलेल्या एका नर्सनेही सहकार्य केले,” असे एअर इंडिया एक्सप्रेसने सांगितले.
“थायलंडची नागरिक असलेल्या महिलेला प्रसूती कळा सुरू होताच, कर्मचाऱ्यांनी त्वरीत प्रतिसाद दिला – जन्मासाठी सुरक्षित आणि सहानुभूतीपूर्ण वातावरण सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या कठोर प्रशिक्षणाचा उपयोग केला,”, अशी माहिती एअरलाइन्सलने दिली.
एअर इंडिया एक्सप्रेसने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, ही महिला थायलंडची नागरिक असून तिला भारतासाठी कोणताही व्हिसा नव्हता. ती फक्त मुंबईत ट्रान्झिटमध्ये होती आणि त्याच रात्री बँकॉककडे जाणाऱ्या विमानात चढणार होती.
महिलेची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच प्रवाशांची आसनं बदलण्यात आली, फोन बाजूला ठेवण्यात आले आणि केबिनच्या मागील बाजूस तात्पुरती प्रसूती खोली तयार करण्यात आली. नर्सच्या मार्गदर्शनात आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने महिलेने एका निरोगी मुलाला जन्म दिला.
त्यानंतर वैमानिकांनी मुंबई विमानतळावर प्राधान्याने उतरण्यासाठी हवाई नियंत्रणाशी संपर्क साधला. तिथे आधीच तयार असलेल्या वैद्यकीय पथकाने आई व बाळाला जवळच्या रुग्णालयात हलवले. एअर इंडिया एक्सप्रेसकडून सांगण्यात आले की, या महिलेच्या मदतीसाठी थायलंडच्या वाणिज्य दूतावासाशी संपर्क साधण्यात आला असून, तिच्या आणि बाळाच्या सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे.