America-Iran : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे आज अमेरिका आणि इराण यांची युद्धविरामावर चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे, दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी एकाच टेबलवर समोरासमोर बसून एकत्र चर्चा केली नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी आधी इराण प्रतिनिधींशी चर्चा केली आणि मग अमेरिकेच्या प्रतिनिधीशी स्वतंत्र चर्चा केली. दोन्ही देशांनी युद्धविरामासाठी अनेक अटी लादल्या आहेत. तर इस्रायल या चर्चेपासून दूर आहे. त्यामुळे ही चर्चा आता कशी पुढे जाते, याकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले आहे.
चाळीस दिवस सुरू असलेल्या अमेरिका आणि इराण यांच्यात 9 एप्रिल रोजी दोन आठवड्यांसाठी युद्धविराम जाहीर झाला. त्यानंतर पाकिस्तानच्या पुढाकाराने आज व उद्या दोन्ही देश इस्लामाबाद येथे तहाची चर्चा करणार आहेत. या
चर्चेसाठी दोन्ही देशांची प्रतिनिधी मंडळे आज इस्लामाबाद येथे पोहोचली. अमेरिकेच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स करत असून, विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ, लष्करी अधिकारी ब्रॅड कूपर आणि ट्रम्प यांचे जावई जारेड क्रुशनर यांचा मंडळात समावेश आहे. तर इराणच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व इराण संसदेचे अध्यक्ष मोहम्मद गालबाफ करत असून, त्यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि उपपरराष्ट्र मंत्री मजिद तख्त खांची आहेत. पाकिस्तानात आल्यानंतर इराणचे प्रतिनिधी मंडळ इस्लामाबादच्या सेरेना हॉटेलमध्ये दाखल झाले. त अमेरिकेचे शिष्टमंडळ पॅरिस मार्गे पाकिस्तानच्या नूर खान बेस विमानतळावर उतरले. औपचारिक चर्चेपूर्वी प्रथम इराणच्या प्रतिनिधी मंडळाने पाक पंतप्रधानांच्या
कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. त्यावेळी गालबाफ यांनी आपल्या कोटवर युद्धाच्या पहिल्या दिवशी हवाई हल्ल्यात ठार झालेले सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला खोमेनी आणि सध्याचे सर्वोच्च धार्मिक नेते मोजतबा खामेनी यांचे फोटो असलेला बिल्ला लावला होता. त्यानंतर अमेरिकेच्या शिष्टमंडळाने पाक पंतप्रधानांची भेट घेतली.

या चर्चेआधी दोन्ही देशांनी अनेक अटी एकमेकांसमोर ठेवल्या आहेत. युद्धविरामाची प्राथमिक घोषणा झाली, तेव्हा अमेरिकेने इराणपुढे 15 कलमी प्रस्ताव ठेवला होता. तर इराणनेही अमेरिकेसमोर 10 कलमी प्रस्ताव ठेवला होता. आज दोन्ही देशांत त्याच्यावर चर्चा सुरू झाली. अमेरिकेने इराणवर अणुकार्यक्रम बंद करावा, युरेनियम संवर्धन करू नये, आपल्याकडील सर्व उच्च-स्तरीय संवर्धित युरेनियम काढून टाकावे आणि आपल्या अणुसुविधा बंद कराव्यात किंवा मर्यादित कराव्यात, होर्मुज सामुद्रधुनी खुली करावी, अशा अटी घातल्या आहेत. इराणने लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचे उत्पादन करू नये, असेही अमेरिकेचे म्हणणे आहे. इराणने हमासला पाठिंबा देऊ नये, असाही अमेरिकेचा आग्रह आहे.

दुसर्या बाजूला इराणने अट ठेवली आहे की, अमेरिकेने आपल्या गोठवलेल्या मालमत्ता मोकळ्या कराव्यात, आपल्यावरील सर्व आंतरराष्ट्रीय निर्बंध हटवावे, युरेनियम संवर्धन कार्यक्रम सुरूच राहावा, होर्मुज बंदरातून रोज फक्त 15 जहाजांना जाण्यास परवानगी द्यावी, लेबनॉन वरील हल्ले थांबवावे आणि युध्दात झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे इराणची अब्जावधी डॉलरची मालमत्ता विविध देशांमध्ये अडकली आहे. एकट्या कतारमध्ये इराणचे 6 अब्ज डॉलर अडकले आहेत. युद्धामुळे या मालमत्तेची आता इराणला गरज आहे. आज दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू होण्यापूर्वी अमेरिकेने इराणच्या या मालमत्ता सोडायची तयारी दर्शवली आहे, असे वृत्त पसरले होते. नंतर अमेरिकेकडून याचा इन्कार करण्यात आला. इराणने युरेनियम संवर्धन थांबवण्याची मागणीही पूर्णपणे धुडकावली आहे. आपण एक स्वतंत्र देश असून, आपला अणुकार्यक्रम विधायक गोष्टीसाठी आहे, असा इराणचा दावा आहे. आपल्यावरील होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्याच्या अमेरिकच्या मागणीसही इराणने स्पष्ट नकार दिला आहे. होर्मुजमधून दररोज 15 जहाजे जातील, त्यांना टोल लागू केला जाईल, असे इराणने म्हटले आहे. युद्धात झालेल्या नुकसानीची भरपाई इराणने मागितली आहे. याशिवाय अमेरिका आणि इस्रायलने लेबनॉनवरील हल्ले ताबडतोब थांबवावेत, अशी मागणी केली आहे. परंतु इस्रायलने भूमिका घेतली आहे की, युद्धविराम लेबनॉनला लागू नाही. त्यामुळे लेबनॉनवरील हल्ले थांबवणार नाही. लेबनॉन सरकारने हिजबुल्लाला संपवावे. मग आम्ही चर्चा करू. इस्त्रायलने आजही लेबनॉनवर हल्ले केले. मात्र अमेरिका आणि इस्रायल यांना वेगळे धरता येणार नाही, असे इराणचे म्हणणे आहे.
दोन्ही देश आपल्या भूमिकांवर ताठर असल्याचे सध्या तरी दिसत आहे. त्यांची चर्चा उद्याही चालणार असून, त्यातून नेमके काय निष्पन्न होईल, यावर आखाती युद्ध थांबणार की, पुढे चालू राहणार, हे ठरणार आहे.
माझे सोबती! मिनाब 168
इस्लामाबादमध्ये पोहोचल्यानंतर इराणचे सभापती गालबाफ यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. 28 फेब्रुवारी रोजी इराणमधील मिनाब शहरातील एका प्राथमिक शाळेवर इस्त्रायलने हल्ला केला होता. त्यात 168 विद्यार्थी ठार झाले होते. या हल्ल्यात ठार झालेल्या विद्यार्थ्यांचे फोटो, त्यांच्या शालेय बॅगा व बूट आणि फुले सीटवर मांडलेली फोटोत दिसत आहेत. या फोटोखाली त्यांनी लिहिले आहे की, या विमानातील माझे सोबती, मिनाब 168.











