पाकिस्तानात हाफिज सईदच्या निकटवर्तीय दहशतवाद्यावर गोळीबार? जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल

Amir Hamza

बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा (Lashkar-e-Taiba – LeT) सह-संस्थापक अमीर हमजा (Amir Hamza) लाहोरमधील त्याच्या निवासस्थानी झालेल्या एका अपघातात जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर एका रुग्णालयात उपचार घेत आहे.

गेल्याकाही दिवसांपासून भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. त्यातच आता लष्कर-ए-तैयबाचा सह-संस्थापक अमीर हमजावर हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

रिपोर्टनुसार, लष्कर-ए-तैयबाच्या 17 संस्थापकांपैकी एक असलेल्या हमजाला त्याच्या घरात झालेल्या अपघातात दुखापत झाली आहे. सोशल मीडियावर अनेक वृत्तांमध्ये त्याला गोळी लागल्याचे सांगण्यात आले, मात्र तपासात ही अटकळ चुकीची असल्याचे समोर आले आहे.

अमीर हमजा अफगाण मुजाहिदीनचा (Afghan mujahideen) अनुभवी सदस्य आहे आणि त्याला दीर्घकाळ लष्कर-ए-तैयबाचा एक महत्त्वाचा विचारवंत मानले जाते. त्याच्या ज्वलंत भाषणांसाठी आणि विपुल लेखनासाठी तो ओळखला जातो. तो एकेकाळी लष्कर-ए-तैयबाच्या अधिकृत प्रकाशनाचा संपादक होता आणि त्याने 2002 मध्ये ‘काफिला दावत और शहादत’ (Qafila Da’wat aur Shahadat) यासह अनेक पुस्तके लिहिली आहेत.

अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने (United States Treasury Department) लष्कर-ए-तैयबाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे आणि अमीर हमजाला निर्बंध असलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत टाकले आहे. तो लष्कर-ए-तैयबाच्या केंद्रीय समितीचा सदस्य होता आणि निधी उभारणी, भरती आणि अटकेतील दहशतवाद्यांच्या सुटकेसाठीच्या वाटाघाटीत त्याची महत्त्वपूर्ण भूमिका होती, असे मानले जाते.

2018 मध्ये, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असलेल्या जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशन या धर्मादाय संस्थांवर आर्थिक कारवाई केल्यानंतर, हमजाने लष्करपासून स्वतःला दूर ठेवल्याचे वृत्त आहे. त्यानंतर त्याने जैश-ए-मनकफा नावाचा एक वेगळा गट स्थापन केला, जो कथितरित्या जम्मू आणि काश्मीरमध्येदहशतवादी कारवाया सुरू ठेवण्यासाठी होता.

रिपोर्टनुसार, हा गट पाकिस्तानात मुक्तपणे कार्यरत आहे आणि हमजा लष्कर-ए-तैयबाच्या नेतृत्वाच्या सतत संपर्कात आहे.

दरम्यान, अमीर हमजाच्या प्रकृतीबाबत पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्याच्यावर खरचं गोळ्या झाडण्यात आल्या की घरात दुखापत झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही. काही दिवसांपूर्वीच लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी अबू सैफुल्लाहला पाकिस्तानमध्ये काही अज्ञातांनी गोळ्या घालून ठार केले होते. आता अमीर हमजाला दुखापतीनंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.