Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशातील मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीवरून मोठे विधान केले आहे. दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशमधून होणाऱ्या ‘घुसखोरीमुळे’ मुस्लिमांची लोकसंख्या वाढत असल्याचा दावा केला आहे.
घुसखोरीमुळे लोकसंख्येत बदल
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार अमित शाह म्हणाले की, देशात मुस्लिमांची लोकसंख्या 24.6 टक्के वाढली आहे, तर हिंदूंची लोकसंख्या 4.5 टक्के कमी झाली आहे. लोकसंख्या वाढीतील हा बदल केवळ प्रजनन दरामुळे झालेला नाही, तर तो घुसखोरीमुळे झाला आहे.
भारताची फाळणी धर्मामुळे झाली. भारताच्या दोन्ही बाजूंना पाकिस्तानची निर्मिती झाली आणि त्या भागातून झालेल्या घुसखोरीमुळे लोकसंख्येच्या प्रमाणावर परिणाम झाला आहे.
घुसखोर आणि शरणार्थी यांच्यातील फरक स्पष्ट करताना शाह म्हणाले की, पाकिस्तान आणि बांगलादेशमधील कमी झालेली हिंदू लोकसंख्या भारतात शरणार्थी म्हणून आली. परंतु, भारतात वाढलेली मुस्लिम लोकसंख्या ही केवळ प्रजनन दरामुळे नव्हे, तर मोठ्या प्रमाणात मुस्लिमांनी देशात घुसखोरी केल्यामुळे वाढली आहे.
‘मतदानाचा अधिकार फक्त नागरिकांनाच’
अमित शहा यांनी ठामपणे सांगितले की, मतदानाचा अधिकार फक्त देशाच्या नागरिकांनाच उपलब्ध असावा. घुसखोरांचा समावेश मतदार यादीत करणे हे संविधानाच्या मूळ भावनेला प्रदूषित करते. ‘भारतीय नागरिक असणे आणि मतदानाचे पात्र वय गाठणे’, या मतदार व्याख्येनुसार मतदार यादी अचूक असल्याशिवाय मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका होऊ शकत नाहीत, असेही ते म्हणाले.
एसआयआर (SIR) हा राष्ट्रीय मुद्दा
निवडणूक आयोगाच्या विशेष सघन पुनरीक्षण (Special Intensive Revision) मतदार यादी आणि घुसखोरी याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये, हे राष्ट्रीय मुद्दे आहेत, असे शाह यांनी स्पष्ट केले. काँग्रेस पक्षाने एसआयआरच्या मुद्द्यावर ‘नकारार्थी भूमिका’ घेतली आहे, कारण यामुळे त्यांचे मतपेढीचे राजकारण कमी होत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
हे देखील वाचा – व्हेनेझुएलाच्या ‘आयर्न लेडी’ मारिया मचाडो यांना शांततेचा नोबेल; कोण आहेत हुकूमशाहीविरोधात लढणाऱ्या या नेत्या?