Andhra Pradesh : आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात एक दुर्दैवी अपघात घडला आहे. काशी बुग्गा वेंकटेश्वर स्वामी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान दहा भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाल्याचे देखील वृत्त आहे. यापैकी काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहेत, त्यामुळे मृतांचा आकडा अधिक वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणावर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
काही वृत्तांनुसार शनिवारी एकादशीनिमित्त वेंकटेश्वर स्वामी मंदिरात भाविक भक्तांची मोठी गर्दी जमली होती. मंदिर संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ अचानकच गर्दी वाढली, ज्यामुळे भविकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आणि चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिति निर्माण झाली. घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि मदत आणि बचाव कार्य सुरू केले.
नेमकं प्रकरण काय?
कार्तिक महिन्याच्या एकादशीनिमित्त मंदिरात प्रचंड मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. श्री वेंकटेश्वर स्वामी हे खासगी मंदिर असून केवळ चार महिन्यांपूर्वीच या मंदिराचे उद्घाटन झाले होते . सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय येथे मेळावा आयोजित केला शिवाय बाहेर जाण्याचे मार्ग मर्यादित होते. यावेळी स्टील रेलिंग कोसळली ज्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि लोक एकमेकांवर पडले. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच हा अपघात झाला.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस कर्मचारी आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी तात्काळ दाखल झाली. गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि मदत कार्य जलद पद्धतीने करण्यासाठी अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. घटनेनंतर राज्याचे कृषी मंत्री के.अचन्नायडू हे देखील लगेच मंदिरात पोहोचले आणि मंदिर व्यवस्थापन अधिकाऱ्यांची त्यांनी भेट घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. जखमी लवकर बरे होण्यासाठी देखील त्यांनी प्रार्थना केली. मृतांच्या नातेवाईकांना पीएमएनआरएफ कडून प्रत्येकी २ लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत जाहीर केली आहे.
याठिकाणी शेकडो भाविक पूजा टोपल्या घेऊन पायऱ्यांवर धडकत होते. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी घटनेवर शोक व्यक्त करून मृतांच्या कुटुंबियांना सांत्वना दिली. त्यांनी जखमींना त्वरित वैद्यकीय सेवा देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
हे देखील वाचा –









