ED Summons Anil Ambani : रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी (Anil Ambani) यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) 5 ऑगस्टला चौकशीसाठी (ED Summons Anil Ambani) बोलावले आहे. त्यांच्या कंपनीवर 17,000 कोटी रुपयांच्या कर्ज गैरव्यवहाराचा आरोप असून, याबाबत तपास सुरू आहे.
गेल्या आठवड्यात मुंबईत त्यांच्या 35 हून अधिक ठिकाणी छापे टाकल्यानंतर हे समन्स पाठवण्यात आले आहे. ईडीने समन्स बजावल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
अनिल अंबानी यांना 5ऑगस्टला ईडीच्या मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तपासात समोर आले की, 2017 ते 2019 दरम्यान येस बँकेने त्यांच्या कंपन्यांना 3,000 कोटी रुपयांचे बेकायदेशीर कर्ज दिले. रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांनी स्टॉक एक्सचेंजला सांगितले की, छाप्यांचा त्यांच्या कामकाजावर काही परिणाम झाला नाही.
ईडीला संशय आहे की, कर्ज मंजुरीपूर्वी बँकेच्या प्रवर्तकांना पैसे मिळाले. रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि कॅनरा बँकेतील 1,050 कोटी रुपयांच्या कर्ज गैरव्यवहाराचीही चौकशी सुरू आहे. तसेच, परदेशातील अघोषित बँक खाती आणि मालमत्ता तपासण्यात येत आहेत. रिलायन्स म्युच्युअल फंडातील 2,850 कोटींच्या गुंतवणूक आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या 10,000 कोटींच्या कर्ज निधीवरही शंका व्यक्त केली आहे.
रिपोर्टनुसार, अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहाशी संबंधित “अघोषित” परदेशी बँक खाती आणि मालमत्तांचीही ईडी तपासणी करत आहे. ईडी या प्रकरणातील लाचखोरी आणि कर्जाच्या संबंधाचा तपास करत आहे. या प्रकरणाची व्याप्ती वाढत असून, अनिल अंबानींना 5 ऑगस्टला आपली बाजू मांडावी लागणार आहे.