Anmol Bishnoi : लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईला अखेर भारतात आणण्यात आले आहे. त्याच्यावर सध्या अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्याकांडात हात असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. तसेच अभिनेता सलमान खान याच्या घरावर हल्ला करण्यामागेही त्याचाच हात असल्याचे समोर आले आहे. अमेरिकेतून डिपोर्ट करण्यात आलेल्या अनमोलला आज सकाळी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले. विमानातून उतरताच अनमोल याला एनआयएच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
अनमोल बिश्नोईला आता टप्प्या टप्प्याने विविध राज्यांमधील पोलीस कोठडीत नेण्यात येणार आहे. मात्र सुरुवातीला एनआयए त्याचा ताबा घेईल, कारण एनआयएने त्याच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. एनआयएची कोठडी संपल्यानंतर अनमोलला दिल्ली पोलीसांकडे सोपवले जाणार असल्याची देखील माहिती आहे. कारण याआधी अनमोलने दिल्लीतील एका व्यावसायिकाला खंडणीसाठी फोन केला होता. तसेच त्याने या व्यावसायिकाच्या घराबाहेर गोळीबार करण्याची धमकी देखील दिली होते. या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी दिल्ली पोलीस अनमोलला ताब्यात घेतील.
यानंतर मुंबई पोलीसांचे गुन्हे शाखेचे पथक बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अनमोलला ताब्यात घेणार आहे. कारण अनमोलवर या हत्याच संपूर्ण कट रचल्याचा गंभीर आरोप आहे. त्यानंतर सिद्धू मूसेवाला हत्याकांड प्रकरणी देखील पंजाब पोलीस अनमोलची चौकशी करणार आहेत. तसेच राजस्थान पोलीसही विविध गुन्ह्यांमध्ये त्याची चौकशी करणार असल्याची माहिती आहे.
अनमोल हा लॉरेन्स बिश्नोईचा लहान भाऊ आहे. लॉरेन्स जेलमध्ये असल्याने अनमोल आतापर्यंत गँग चालवत होता. मात्र आता त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. यामुळे विविध प्रकरणांचा उलगडा होणार आहे. सर्व प्रकरणांची सखोल चौकशी झाल्यानंतर त्याला देशातील सर्वात सुरक्षित जेलमध्ये ठेवले जाणार आहे.
हे देखील वाचा – Chia Seeds : चमकदार त्वचेसाठी हिवाळ्यात या बियांचे सेवन करा..









