Artemis II Moon Mission: अंतराळ संशोधनाच्या इतिहासात ६ एप्रिल २०२६ हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. तब्बल ५३ वर्षांनंतर मानवाने पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून थेट चंद्राच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रात प्रवेश केला आहे.
आर्टेमिस-२ या मोहिमेतील चार अंतराळवीर आता पृथ्वीपासून तब्बल ४,०६,७७३ किलोमीटर लांब जाणार असून, मानवी अंतराळ प्रवासातील आजवरचा सर्वात मोठा पल्ला ते गाठणार आहेत.
अपोलो १३ चा विक्रम मोडीत निघणार
१९७० मध्ये ‘अपोलो १३’ मोहिमेने पृथ्वीपासून ४,००,१७१ किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करून जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता. आता आर्टेमिस-२ हे या अंतरापेक्षा २,५०० किलोमीटर अधिक पुढे गेले आहेत. आहे. ७ एप्रिल २०२६ रोजी पहाटे १२:१५ वाजता (भारतीय वेळेनुसार) हे अंतराळवीर चंद्राच्या मागच्या बाजूने वळसा घालून पृथ्वीकडे परतण्याचा प्रवास सुरू करतील.
काय आहे ‘फ्री-रिटर्न ट्रॅजेक्टरी’?
आर्टेमिस-२ मोहिम एका विशेष तंत्रावर आधारित आहे, ज्याला विज्ञानाच्या भाषेत ‘फ्री-रिटर्न ट्रॅजेक्टरी’ म्हणतात. याचा अर्थ असा की, हे अंतराळयान चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करून स्वतःला पृथ्वीच्या दिशेने फेकून घेईल. यासाठी इंजिन सुरू करण्याची गरज भासणार नाही. जर मोहिमेदरम्यान यानाचे मुख्य इंजिन निकामी झाले, तरीही चंद्राचे गुरुत्वाकर्षण या अंतराळवीरांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणण्यास मदत करेल.
विशाल अंतराळातील आव्हाने
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) पृथ्वीपासून केवळ ४०० किलोमीटर उंचीवर असते, जिथे पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र रेडिएशनपासून संरक्षण करते. मात्र, आर्टेमिस-२ चे अंतराळवीर या सुरक्षा कवचाच्या बाहेर जाणार आहेत. अवकाशातील घातक किरणोत्सर्गाचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो, याचा सखोल अभ्यास या मोहिमेत केला जाणार आहे.
वेग आणि उष्णतेचा नवा उच्चांक
ही मोहिम केवळ अंतरासाठीच नाही, तर वेगासाठीही विक्रम करणार आहे. पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करताना ओरियन यानाचा वेग ताशी ४०,२०० किलोमीटर इतका असेल. यावेळी यानाच्या बाहेरील उष्णता कवच २,७६० अंश सेल्सिअस तापमानाचा सामना करेल, जे सूर्याच्या पृष्ठभागाच्या तापमानापेक्षा निम्मे आहे.
मानवाचे पुढील ध्येय ‘मंगळ’ ग्रह आहे आणि चंद्राची ही मोहिम म्हणजे त्या महाप्रवासाची एक महत्त्वाची तालीम मानली जात आहे.









