पाटणा- बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly elections) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) एकामागोमाग एक घोषणा करत आहेत. आता बिहार राज्यातील आशासेविकांना (Asha workers) दर महिन्याला ३ हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. यावर राजदचे तेजस्वी यादव यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, सरकारने त्यांच्या मानधनात वाढ करायला हवी होती. त्याऐवजी त्यांनी हा प्रोत्साहन भत्ता दिला आहे.
बिहारमधील आशासेविकांना सध्या मिळणाऱ्या प्रतिमहिना एक हजार रुपयांबरोबरच महिना ३ हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ममता आरोग्यसेविकांना सध्या मिळणाऱ्या प्रत्येक प्रसुतीसाठी मिळणाऱ्या ३०० रुपये प्रोत्साहन भत्त्यात दुपटीने वाढ केली आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, या रकमेत वाढ झाल्यामुळे त्यांचा उत्साह वाढणार असून आरोग्यसेवाही बळकट होणार आहे. आशा सेविका या ग्रामीण भागातील महिलांना आरोग्यविषयक सेवा देत असतात तर ममता सेविका या सरकारी रुग्णालयात नवजात बाळांची व मातेची काळजी घेत असतात.
मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेवर राजदने टीका केली आहे. तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) म्हणाले की, सत्ताधाऱ्यांच्या मनात सत्ता जाण्याची ही भीती पाहून आनंद होतो. आम्ही सत्तेवर आल्यानंतर आशा सेविकांना प्रोत्साहन भत्त्या ऐवजी त्यांच्या मानधनातच वाढ करणार आहोत. मी आरोग्य मंत्री असताना या प्रस्तावावर काम केले होते. मात्र आयत्यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हा निर्णय बदलला होता. आता ते तीच संकल्पना राबवत आहेत.