Ashley Tellis Arrest : अमेरिकेच्या परराष्ट्र विभागातील एक ज्येष्ठ अधिकारी आणि भारतीय वंशाचे तज्ज्ञ ॲश्ले टेलिस यांच्यावर गोपनीय आणि राष्ट्रीय संरक्षण माहितीशी संबंधित रेकॉर्ड बेकायदेशीरपणे बाळगल्याचा गंभीर आरोप आहे. व्हर्जिनिया येथील फेडरल कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानंतर त्यांना अटक करण्यात आली.
ॲश्ले टेलिस यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी गोपनीय दस्तऐवज बेकायदेशीरपणे ठेवले आणि चीनी सरकारी अधिकाऱ्यांशी अनेक गुप्त भेटी घेतल्या. कोर्टाच्या कागदपत्रांमधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आरोपांमुळे अमेरिकेच्या सुरक्षा वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
अटक आणि आरोपांची पार्श्वभूमी
64 वर्षीय ॲश्ले जे. टेलिस हे भारतीय वंशाचे असून, 2001 पासून अमेरिकेच्या परराष्ट्र विभागात वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. अमेरिका-भारत नागरी अणु कराराच्या चर्चांमध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्यांनी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातही वरिष्ठ पदांवर काम केले आहे.
व्हर्जिनिया कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, टेलिस यांनी सप्टेंबर 2022 ते सप्टेंबर 2025 या काळात व्हर्जिनियातील फेअरफॅक्स येथील रेस्टॉरंट्समध्ये चीनी सरकारी अधिकाऱ्यांशी भेटी घेतल्या.
15 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या एका डिनरचा उल्लेख करताना कागदपत्रात म्हटले आहे: “टेलिस एका मॅनिला लिफाफ्यासह रेस्टॉरंटमध्ये आले होते, मात्र बाहेर जाताना तो लिफाफा त्यांच्याकडे नव्हता.”
या भेटींदरम्यान इराण-चीन संबंध आणि अमेरिका-पाकिस्तान संबंधांवर चर्चा झाल्याचे तसेच टेलिस यांनी अधिकाऱ्यांकडून एक लाल रंगाची भेटवस्तू घेतल्याचाही उल्लेख प्रतिज्ञापत्रात आहे.
टेलिस आणि ट्रम्प यांचे जुने संबंध
अटकेत असलेले ॲश्ले टेलिस यांनी यापूर्वी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत-अमेरिका संबंधांवर भाष्य केले होते. ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के शुल्क लावल्यानंतर टेलिस यांनी या निर्णयामागील कारण सांगितले होते.
शिक्षेची तरतूद
अमेरिकेच्या न्याय विभागाकडून (Justice Department) देण्यात आलेल्या माहितीनुसार, बेकायदेशीररित्या गोपनीय दस्तऐवज बाळगल्याचा आरोप सिद्ध झाल्यास ॲश्ले टेलिस यांना मोठी किंमत चुकवावी लागेल. या गुन्ह्यासाठी त्यांना जास्तीत जास्त 10 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. तसेच, त्यांच्यावर 2,50,000 डॉलरपर्यंतचा दंडही ठोठावला जाऊ शकतो.
हे देखील वाचा – ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर रोहित-विराट निवृत्त होणार का? BCCI उपाध्यक्ष म्हणाले…