Pak Army Chief Promoted To Field Marshal | पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर (General Asim Munir) यांना ‘फील्ड मार्शल’ (Field Marshal) या सर्वोच्च लष्करी पदावर बढती देण्यात आली आहे. हे पद अत्यंत दुर्मिळ परिस्थितीत आणि सशस्त्र दलातील संपूर्ण कारकिर्दीत उत्कृष्ट कामगिरी केल्यावर दिले जाते.
पंतप्रधान शेहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानच्या मंत्रिमंडळाने लष्कर प्रमुखांना पदोन्नती देण्याच्या प्रस्तावाला ‘मंजुरी’ दिली आहे. ही घोषणा जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्याने सुरू झालेल्या भारतासोबतच्या लष्करी तणावानंतर काही दिवसात करण्यात आली आहे.
दोन्ही देशातील तणावत भारत वरचढ ठरला होता. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले होते. असे असले तरीही पाकिस्तान सरकारने असीम मुनीर यांना फील्ड मार्शल पद देण्याची घोषणा केली आहे.
दहशतवादी हल्ल्यापूर्वीचे जातीयवादी भाषण
जनरल असीम मुनीर यांचे भडकाऊ आणि धक्कादायक जातीयवादी भाषण हे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे मुख्य कारण मानले जाते. या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
पाकिस्तानशी संबंधित असलेला हा दहशतवादी हल्ला ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (The Resistance Front) या बंदी घालण्यात आलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या (Lashkar-e-Taiba) एका गटाने केला होता. यानंतर भारताने दहशतवादाविरुद्ध लष्करी कारवाई केली. ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ अचूक क्षेपणास्त्र हल्ल्यांनी उद्ध्वस्त केले. 9 प्रमुख दहशतवादी तळ आणि संबंधित पायाभूत सुविधा नष्ट करण्यात आल्या.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताने भारतीय लष्करी ठिकाणं तसेच नागरी आणि धार्मिक स्थळांना लक्ष्य करून लष्करी हल्ले सुरू केले. पाकिस्तानकडून सलग तीन रात्री ड्रोन हल्ले झाले, परंतु बहुतेक हल्ले भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने यशस्वीरित्या हाणून पाडले.
याला प्रत्युत्तर म्हणून भारताने अचानक आणि सुनियोजित क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला पाकिस्तानच्या 12 हवाई तळांवर केला, ज्यामुळे पाकिस्तानच्या लष्करी पायाभूत सुविधा आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर दोन्ही देशांनी शस्त्रसंधीची घोषणा केली होती. या संघर्षात भारताने पाकिस्तानमधील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करत मोठे नुकसान केले होते. या संघर्षात पीछेहाट झाल्यानंतरही 10 दिवसांपेक्षा कमी कालावधीत जनरल असीम मुनीर यांना या हास्यास्पद आणि अपमानजनक दाव्यांवर आधारित ‘फील्ड मार्शल’ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
आजीवन लष्कर प्रमुख?
1947 मध्ये पाकिस्तानच्या निर्मितीपासून, या देशाने फील्ड मार्शल हे पंचतारांकित पद (five-star rank) फक्त एकदाच जनरल अयूब खान (General Ayub Khan) यांना दिले आहे -त्यांनी १९६५ मध्ये पाकिस्तानचे हुकूमशहा असताना स्वतःला हे पद दिले होते. असीम मुनीर हे देशाचे दुसरे फील्ड मार्शल बनले आहेत.
फील्ड मार्शल हे सर्वोच्च पद केवळ औपचारिक आहे आणि असीम मुनीर पदोन्नतीनंतरही लष्कर प्रमुख म्हणून कायम राहतील. मात्र, या पदोन्नतीचा अर्थ असीम मुनीर यांना निवृत्तीचे वय नसेल का, हे स्पष्ट झालेले नाही.
असीम मुनीर यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली. एका वर्षानंतर, संसदीय कायद्यातील सुधारणेमुळे त्यांचा कार्यकाळ लष्कर प्रमुखपदाच्या नेहमीच्या तीन वर्षांवरून पाच वर्षांपर्यंत वाढवण्यात आला होता.