Supreme court -सरन्यायाधीश भूषण गवई (Bhushan Gavai) यांच्यावर आज सुनावणी सुरू असताना एका ज्येष्ठ वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. राकेश किशोर असे या ७१ वकिलाचे नाव आहे. त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, सरन्यायाधीश गवई यांनी या घटनेनंतरही आपले कामकाज सुरूच ठेवत अशा घटनांमुळे आपल्यावर कोणताही परिणाम होत नसल्याचे सांगितले.
आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयात (Supreme court)कक्ष क्रमांक १ मध्ये सरन्यायाधीशांसमोर एका खटल्याची सुनावणी सुरू होती. तेव्हा राकेश किशोर अचानक न्यायमूर्तींच्या मंचाजवळ पोहोचले. त्यांनी आपल्या पायातील एक बूट काढला आणि सरन्यायाधीशांच्या दिशेने फेकणार तोच सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले. सुरक्षा रक्षक राकेश कुमार यांना कक्षाबाहेर नेत असताना सनातन का अपमान नही सहेगा हिंदुस्थान, अशा घोषणा ते देत होते. सुरक्षा रक्षकांनी नंतर त्यांना दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले.
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वकील राकेश किशोर हे दिल्लीतील मयूर नगर परिसरातील रहिवासी आहेत. ते सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे सदस्य आहेत. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशच्या खजुराहो मंदिरातील भगवान विष्णूच्या दुरवस्थेप्रकरणी एका याचिकेवर सरन्यायाधीशांसमोर सुनावणी झाली होती. भगवान विष्णुच्या भग्नावस्थेतील मूर्तीचे पुरुज्जीवत करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली होती. त्यावर सरन्यायाधीशांनी तसे आदेश देण्यास नकार दिला. तसेच तुम्ही आता भगवान विष्णुलाच साकडे घाला, अशा आशयाची टिप्पणी केली होती.
सरन्यायाधीशांच्या या टिप्पणी वकील राकेश किशोर यांच्या जिव्हारी लागली होती. त्या संतापातून त्यांनी हे कृत्य केल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, हा प्रकार अनपेक्षित असल्याने कक्षात उपस्थित असलेले वकील भांबावून गेले. मात्र सरन्यायाधीश अत्यंत अविचल राहिले. त्यांनी सुनावणी सुरू ठेवण्याची सूचना केली. विचलित होऊ नका, अशा प्रकारच्या घटना मला माझ्या कर्तव्यापासून विचलित करू शकत नाहीत, असे सरन्यायाधीश गवई म्हणाले.
हे देखील वाचा –