डेहराडून- उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) झालेल्या भीषण ढगफुटीनंतर येथील हर्षिल (Harshil) मध्ये एक तलाव (lake)निर्माण झाला आहे. या भागातील रस्ते नष्ट झाले असून आधुनिक उपकरणाच्या सहाय्याने बचाव कार्य सुरु आहे. आतापर्यंत अनेक पर्यटकाना वाचवण्यात यश आले असून महाराष्ट्रातील पर्यटक (Maharashtra tourist) सुखरुप परत आले आहेत.
उत्तराखंडमध्ये ५ ऑगस्ट रोजी अचानक आलेल्या ढगफुटीमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते तर जागोजागी पर्यटक व चारधाम यात्रेकरु अडकून पडले. याचा सर्वाधिक फटका धराली गावाला बसला आहे. बचाव कार्यात सैन्यातर्फे भेदक रडारच्या सहाय्याने ढिगाऱ्याखाली दबलेल्यांचा शोध घेतला जात आहे. खीर नदीला आलेल्या पूरामुळे हे गावच जमीनदोस्त झाले होते. या गावातील दीडशे ते दोनशे लोक अद्याप ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. या गावात आता इंटरनेट व मोबाईल सुविधा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. धराली, उत्तरकाशी व हर्षिल या भागातील अनेक रस्ते अद्यापही बंदच आहेत. येथील वीजपुरवठाही बंद झाल्यामुळे उत्तरकाशीत महाकाय जनरेटर आणण्यात आला आहे. गंगणी गावाजवळील बेली ब्रिजचे काम सुरु झाले असून तो दोन दिवसात पूर्ण होईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी (CM) दिली आहे. धराली गावातील ८० एकरच्या परिसरात मोठा ढिगारा पसरला आहे. त्याखालील लोकांना शोधण्यासाठीची उपकरणेही अद्याप आलेली नाहीत. हर्षिल ते धारली येथील रस्ताही पूर्णपणे खचला आहे. उत्तरकाशीत मदतकार्य वेगाने सुरु आहे. दरम्यान महाराष्ट्रातील पर्यटक सुखरुप असून ते आज मुंबईत परतले आहेत.