Azam Khan Conviction : समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान आणि त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यांना मोठा धक्का बसला आहे. रामपूरच्या न्यायालयाने दोघांनाही बनावट पॅन कार्ड प्रकरणात दोषी ठरवत प्रत्येकी 7 वर्षांची कठोर शिक्षा आणि 50,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे.
हा निकाल येताच पोलिसांनी वडील आणि मुलाला कोर्टरूममधून ताब्यात घेतले आणि त्यांना तातडीने रामपूर तुरुंगात नेण्यात आले. आझम खान यांची 23 सप्टेंबर 2025 रोजी सीतापूर तुरुंगातून सुटका झाली होती, त्यामुळे अवघ्या 55 दिवसांत त्यांना पुन्हा कारावासाची हवा खावी लागणार आहे.
नेमके काय आहे पॅन कार्ड फसवणूक प्रकरण?
हे प्रकरण 2019 मध्ये दाखल झाले होते, जेव्हा रामपूरमधील भाजप नेते आकाश सक्सेना यांनी आझम खान आणि त्यांच्या मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
तक्रारीनुसार, आझम खान यांनी आपला मुलगा अब्दुल्ला निवडणुकीत उभा राहू शकेल यासाठी बनावट कागदपत्रे वापरली होती. अब्दुल्लाची मूळ जन्मतारीख 1 जानेवारी 1993 असल्याने, तो 2017 च्या विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी पात्र नव्हता, कारण त्याचे वय त्यावेळी 25 वर्षे पूर्ण झालेले नव्हते.
ही कायदेशीर अडचण दूर करण्यासाठीआझम खान यांनी लखनऊ महानगरपालिकेकडून बनावट जन्म प्रमाणपत्र मिळवले. त्या प्रमाणपत्रावर आधारित दुसरे पॅन कार्ड तयार केले गेले, ज्यात त्याची जन्मतारीख 1990 दाखवण्यात आली होती.
न्यायालयात सुनावणीदरम्यान, तक्रारदारांच्या वकिलांनी सिद्ध केले की या संपूर्ण फसवणुकीत वडील आझम खान यांचाही सक्रिय सहभाग होता. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून दोघांनाही दोषी ठरवले.
राजकीय आणि कायदेशीर परिणाम
आझम खान हे अखिलेश यादव यांच्या सरकारमध्ये 2017 पर्यंत नगरविकास मंत्रीहोते. या निकालानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा धक्का बसला आहे.
या निकालावर प्रतिक्रिया देताना अखिलेश यादव यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांवर टीका केली. ते म्हणाले, “सत्तेच्या अभिमानाने प्रेरित होऊन अन्याय आणि अत्याचाराच्या सर्व मर्यादा ओलांडणारे एके दिवशी स्वतः निसर्गाच्या हुकुमाला बळी पडतात आणि त्यांचा विनाशकारी अंत होतो.”
दुसरीकडे, तक्रारदार आकाश सक्सेना यांनी न्यायालयाच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “सत्याचा विजय झाला. आम्ही नेहमीच न्यायालयाचा आदर केला असून आज न्याय मिळाल्याचा खूप आनंद आहे.”
आझम खान यांच्यावर एकूण 104 खटले दाखल आहेत. आतापर्यंत त्यांना सहा प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे, तर पाच प्रकरणांमध्ये निर्दोष मुक्तता मिळाली आहे.
हे देखील वाचा – Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीला मुदतवाढ! आता 31 डिसेंबरपर्यंत प्रक्रिया करा पूर्ण








