Bangladesh Bus Accident- बांगलादेशातील (Bangladesh) राजबारी (Rajbari) जिल्ह्यात भीषण अपघात घडला असून प्रवासी बस पद्मा नदीत (Padma River) कोसळल्याने किमान २३ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक प्रवासी अद्याप बेपत्ता आहेत. ही घटना काल सायंकाळी सुमारे ५ वाजता दौलतदिया फेरी टर्मिनलसमोर घडली.
ढाकाकडे जाणारी बस फेरीवर चढत असताना एका युटिलिटी फेरीने बसला धडक दिली. या धक्क्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून बस थेट नदीत कोसळली. बसमध्ये सुमारे ५० प्रवासी असल्याची माहिती आहे.अपघातानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले.
सुमारे सहा तासांनंतर हमजा या बचाव जहाजाच्या मदतीने बुडालेली बस बाहेर काढण्यात आली. रात्री ११.१५ वाजता बसचा काही भाग दिसू लागला, तर ११.३० वाजता क्रेनच्या सहाय्याने संपूर्ण बस बाहेर काढण्यात आली.बचावलेल्या एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, तो पोहून किनाऱ्यावर पोहोचला; मात्र त्याची पत्नी आणि मुलगा त्याच्या डोळ्यांसमोर बुडाल्याची हृदयद्रावक घटना घडली.
फेरी टर्मिनल प्रशासनानुसार, ज्या ठिकाणी बस कोसळली त्या भागात नदीची खोली सुमारे ३० फूट आहे. अग्निशमन दलाच्या पथकाने आणि डायव्हर्सनी तातडीने शोधमोहीम सुरू केली असून काही प्रवासी अजूनही बेपत्ता असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.पोलीस निरीक्षक रसेल मोल्लाह यांनी सांगितले की, आतापर्यंत २३ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. काही जण बेपत्ता असून काही प्रवासी बचावले आहेत.











