‘भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास…’, बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे वादग्रस्त वक्तव्य

Muhammad Yunus with ALM Fazlur Rahman.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. त्यातच आता बांगलादेशचे माजी लष्करी अधिकारी आणि मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांचे निकटवर्तीय मेजर जनरल (निवृत्त) ए.एल.एम. फजलुर रहमान यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

रहमान यांनी बांगलादेशने भारताची ईशान्येकडील राज्य ताब्यात घ्यावीत, असे विधान केल्याने वाद निर्माण झाला आहे. ‘भारताने जर पाकिस्तानवर (India-Pakistan Conflict) हल्ला केला, तर बांगलादेशने चीनच्या मदतीने भारताच्या ईशान्येकडील सात राज्यांवर कब्जा करावा’, असे विधान त्यांनी केले आहे.

फेसबुक पोस्टमध्ये रहमान यांनी बंगाली भाषेत लिहिले की, “जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला, तर बांगलादेशने भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर कब्जा करण्यासाठी चीनसोबत संयुक्त लष्करी यंत्रणा तयार करावी.” त्यांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

रहमान यांच्या पोस्टमुळे वाद निर्माण झाल्यानंतर बांगलादेशने यावर स्पष्टीकरण दिले आहे. यावर प्रतिक्रिया देताना बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रक जारी करत स्पष्ट केलं की, “हे विधान सरकारच्या धोरणाशी किंवा भूमिकेशी सुसंगत नाही. सरकार कोणत्याही प्रकारे अशा वक्तव्याला समर्थन देत नाही.”

रहमान यांची नेमणूक डिसेंबर 2024 मध्ये मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने राष्ट्रीय स्वतंत्र आयोगाच्या अध्यक्षपदी केली होती. या आयोगाला 2009 च्या बांगलादेश रायफल्स बंडखोरीतील हत्यांची चौकशी करण्याचे जबाबदारी देण्यात आली होती.

यापूर्वी मार्च महिन्यात चीनच्या दौऱ्यावर असताना मोहम्मद युनूस यांनी वक्तव्य केले होते की, “भारताच्या ईशान्य राज्यांना समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग नाही आणि ढाकाच या भागाचा एकमेव संरक्षक आहे.” त्यांनी बीजिंगला (Beijing Diplomacy) बांगलादेशमार्गे वस्तू पाठवण्याचे आमंत्रणही दिले होते.

दरम्यान, गेल्या वर्षी शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर अल्पसंख्याकांवर वाढलेल्या हल्ल्यांमुळे भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. या नव्या वादग्रस्त विधानामुळे तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.