Home / देश-विदेश / Bangladesh PM Race : बांगलादेशात तब्ब्ल २० वर्षांनी बीएनपीची सत्ता; तारीक रहमान होणार नवे पंतप्रधान- ३५ वर्षांनंतर बांगलादेशला मिळणार पुरुष पंतप्रधान?

Bangladesh PM Race : बांगलादेशात तब्ब्ल २० वर्षांनी बीएनपीची सत्ता; तारीक रहमान होणार नवे पंतप्रधान- ३५ वर्षांनंतर बांगलादेशला मिळणार पुरुष पंतप्रधान?

Bangladesh PM Race : बांगलादेशमध्ये गुरुवारी पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ने (BNP) ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. गेल्या...

By: Team Navakal
Bangladesh PM Race
Social + WhatsApp CTA

Bangladesh PM Race : बांगलादेशमध्ये गुरुवारी पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ने (BNP) ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या शेख हसीना यांच्या आवामी लीगच्या वर्चस्वाला धक्का देत बीएनपीने निर्विवाद बहुमत मिळवले आहे. एकूण २९९ मतदारसंघांपैकी आतापर्यंत २८६ जागांचे निकाल हाती आले असून, एकट्या बीएनपीने २०९ जागांवर विजय मिळवून १५० हा बहुमताचा आकडा सहज पार केला आहे.

युतीचे संख्याबळ आणि दिग्गज नेत्यांचा विजय-
या निवडणुकीत जमात-ए-इस्लामीच्या नेतृत्वाखालील ११ पक्षांच्या आघाडीनेही प्रभावी कामगिरी केली असून त्यांच्या पदरात ७० जागा पडल्या आहेत. जमात-ए-इस्लामीचे प्रमुख शफीकुर रहमान यांनी ढाका-१५ या प्रतिष्ठेच्या मतदारसंघातून विजय मिळवत आपले स्थान पक्के केले आहे. या विजयामुळे बांगलादेशच्या राजकारणात सुमारे दोन दशकांनंतर बीएनपीचे सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला असून २००८ पासून सलग सत्तेत असलेल्या आवामी लीगची सत्ता संपुष्टात आली आहे.

३५ वर्षांनंतर पुरुष पंतप्रधानाचे आगमन-
या निवडणूक निकालाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या साडेतीन दशकांपासून बांगलादेशच्या राजकारणात असलेल्या महिला वर्चस्वाला आता पूर्णविराम मिळणार आहे. १९९१ ते २०२४ या प्रदीर्घ काळात शेख हसीना आणि खालिदा झिया या दोन महिला नेत्यांनीच देशाचे नेतृत्व केले होते. १९८८ मध्ये काझी जफर अहमद यांच्या रूपाने देशाला शेवटचे पुरुष पंतप्रधान लाभले होते. आता तब्बल ३५ वर्षांनंतर ही परंपरा मोडीत निघणार असून माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे सुपुत्र तारिक रहमान हे पंतप्रधान पदाची शपथ घेतील, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

तारिक रहमान यांचे पुनरागमन-
बीएनपीचे अध्यक्ष तारिक रहमान यांनी दोन स्वतंत्र मतदारसंघांतून निवडणूक लढवली होती आणि दोन्ही ठिकाणी त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, १७ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांचे स्वदेशात पुनरागमन झाले होते. त्यांच्या या पुनरागमनाने पक्षाला मोठी उभारी मिळाली, ज्याचे रूपांतर आता मोठ्या विजयात झाले आहे. या निकालांमुळे बांगलादेशच्या राजकीय पटलावर नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे.

कट्टरतावादाला नाकारून जनतेचा ‘बीएनपी’ला कौल; हिंदू मते ठरली निर्णायक?
‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’च्या (BNP) एकतर्फी विजयामागे केवळ सत्ताविरोधी लाट नसून, मतदारांच्या ध्रुवीकरणाचे आणि जुन्या इतिहासाचे मोठे योगदान असल्याचे स्पष्ट होत आहे. या निवडणुकीत कट्टरपंथी ‘जमात-ए-इस्लामी’ आणि विद्यार्थी आंदोलनातून उदयाला आलेल्या ‘नॅशनल सिटीझन्स पार्टी’चा (NCP) मोठा पराभव झाला आहे.

अवामी लीग आणि हिंदू मतदारांचे ‘बीएनपी’कडे स्थलांतर-
या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक आणि निर्णायक बदल म्हणजे शेख हसीना यांच्या अवामी लीगच्या पारंपरिक मतपेढीने बीएनपीला दिलेला पाठिंबा. आणि बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याक समाज आणि अवामी लीगचे निष्ठावान मतदार यावेळी मोठ्या प्रमाणावर बीएनपीकडे वळले आहेत. यामुळेच अवामी लीगचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या गोपाळगंजमध्ये बीएनपीला मोठे यश मिळाले. याशिवाय खुलना, सिल्हेट, चटगांव आणि ठाकूरगंज यांसारख्या महत्त्वाच्या प्रांतांतही बीएनपीने निर्विवाद वर्चस्व गाजवत विजय मिळवला आहे.

कट्टरतावाद आणि जमातचा ऐतिहासिक डाग-
निवडणुकीपूर्वी मोठी शक्ती म्हणून मिरवणाऱ्या जमात-ए-इस्लामीच्या नेतृत्वाखालील आघाडीला अवघ्या ७० जागांवर समाधान मानावे लागले आहे. या पराभवाचे मुख्य कारण म्हणजे बांगलादेशच्या मुक्ती संग्रामाचा इतिहास. १९७१ च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या वेळी जमात-ए-इस्लामीने केलेला विरोध आणि कट्टरपंथी विचारसरणी यांमुळे जनतेमध्ये त्यांच्याबद्दल अविश्वासाची भावना होती. हा जुना डाग पुसण्यात जमात अपयशी ठरली, ज्याचा थेट फायदा बीएनपीला झाला.

विद्यार्थी संघटनेच्या ‘एनसीपी’चा अपेक्षाभंग-
शेख हसीना यांचे सरकार पायउतार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘नॅशनल सिटीझन्स पार्टी’ला (एनसीपी) मतदारांनी सपशेल नाकारले आहे. आंदोलनाच्या जोरावर राजकारणात स्थिरावण्याचा या विद्यार्थी पक्षाचा प्रयत्न फसला असून, बांगलादेशी जनतेने प्रस्थापित आणि अनुभवी राजकीय नेतृत्वावरच विश्वास दर्शवला आहे. अराजकता टाळून देशात स्थैर्य निर्माण करण्यासाठी मतदारांनी बीएनपीला कौल दिल्याचे चित्र या निकालांवरून स्पष्ट होत आहे.

बीएनपीच्या विजयाचे सर्वात मोठे घटक तारिक रहमान ठरले-
बांगलादेशच्या राजकारणात ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ने (बीएनपी) मिळवलेल्या अभूतपूर्व यशाचे संपूर्ण श्रेय पक्षाचे नवनियुक्त अध्यक्ष तारिक रहमान यांना दिले जात आहे. माजी राष्ट्रपती झियाउर रहमान आणि माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे सुपुत्र असलेल्या तारिक रहमान यांनी प्रतिकूल परिस्थितीत पक्षाची धुरा सांभाळून देशाला एका नव्या राजकीय दिशेकडे नेले आहे.

तारिक रहमान यांचा हा विजय केवळ राजकीय नसून तो वैयक्तिक संघर्षाचाही विजय मानला जात आहे. २००८ मध्ये राजकीय अस्थिरतेमुळे त्यांना देश सोडावा लागला होता. तत्कालीन शेख हसीना सरकारने त्यांच्यावर ८० हून अधिक गुन्हे दाखल केले होते, ज्यामध्ये त्यांना जन्मठेपेसह १७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, लंडनमध्ये राहूनही त्यांनी २०१८ पासून पक्षाच्या ‘कार्यकारी अध्यक्ष’ पदावरून संघटनेची बांधणी सुरूच ठेवली. तब्बल १७ वर्षांनंतर, २५ डिसेंबर २०२५ रोजी त्यांचे मायदेशात आगमन झाले, जे बीएनपीसाठी एका मोठ्या ‘राजकीय बूस्टर’ ठरले. ढाका विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी मातृभूमीला स्पर्श करून केलेले अभिवादन देशभर चर्चेचा विषय ठरले होते.

नेतृत्वातील बदल आणि जनतेशी संवाद
३० डिसेंबर २०२५ रोजी पक्षाच्या सर्वेसर्वा बेगम खालिदा झिया यांचे निधन झाल्यामुळे पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली होती. त्यानंतर ९ जानेवारी २०२६ रोजी तारिक रहमान यांची पक्षाच्या अध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली. मायदेशात परतल्यानंतर त्यांनी विश्रांती न घेता संपूर्ण देशाचा झंझावाती दौरा केला. मंचावर सर्वसामान्य नागरिकांना बोलावून त्यांच्याशी थेट संवाद साधण्याची त्यांची शैली आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी त्यांनी सादर केलेला ‘रोडमॅप’ यामुळे तरुण मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल कमालीची ओढ निर्माण झाली.

विजयाची प्रमुख कारणे आणि राजकीय समीकरणे-
बीएनपीच्या या विजयामागे अनेक महत्त्वपूर्ण घटक एकत्र आले आहेत:
१. सहानुभूतीची लाट: बेगम खालिदा झिया यांच्या निधनामुळे जनतेमध्ये निर्माण झालेली सहानुभूती बीएनपीच्या पथ्यावर पडली.
२. अवामी लीगची अनुपस्थिती: अवामी लीगने निवडणुकीतून माघार घेतल्याने मोठा मतदार वर्ग विखुरला गेला होता. ढाका विद्यापीठाचे प्राध्यापक सैफुल आलम चौधरी यांच्या मते, अवामी लीगच्या सुमारे १०% पारंपरिक मतदारांनी थेट बीएनपीला कौल दिला.
३. कट्टरतावादाचा तिरस्कार: विद्यार्थी नेत्यांकडून झालेली निराशा आणि ‘जमात-ए-इस्लामी’च्या जुन्या इतिहासामुळे लोकांमध्ये असलेला संताप बीएनपीसाठी फायदेशीर ठरला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून तारिक रहमान यांचे अभिनंदन; ‘प्रगतीशील बांगलादेशच्या पाठीशी भारत खंबीरपणे उभा’
बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ने (बीएनपी) मिळवलेल्या दणदणीत विजयाची दखल जागतिक स्तरावर घेतली जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीएनपीचे अध्यक्ष आणि भावी पंतप्रधान तारिक रहमान यांचे या ऐतिहासिक यशाबद्दल मनापासून अभिनंदन केले आहे. या शुभेच्छांच्या माध्यमातून भारताने शेजारील राष्ट्राशी असलेले संबंध अधिक दृढ करण्याचे संकेत दिले आहेत.

लोकशाही कौलाचा गौरव-
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात बांगलादेशच्या जनतेने दर्शवलेल्या लोकशाही अधिकाराचे कौतुक केले. ते म्हणाले, “हा विजय म्हणजे बांगलादेशातील जनतेने तुमच्या नेतृत्वावर आणि ध्येयधोरणांवर दाखवलेला दृढ विश्वास आहे. लोकशाही प्रक्रियेतून आलेले हे यश देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.” बांगलादेशमध्ये झालेल्या सत्तांतराचा भारताने खुल्या मनाने स्वीकार केल्याचे या संदेशातून स्पष्ट होत आहे.

विकास आणि सहकार्याचा नवा अध्याय
भारताची भूमिका स्पष्ट करताना पंतप्रधान मोदींनी नमूद केले की, भारत नेहमीच एका स्थिर, लोकशाहीवादी आणि प्रगतीशील बांगलादेशच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. उभय देशांमधील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांचा उल्लेख करत त्यांनी आगामी काळात विकासाच्या मुद्द्यावर एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली. “आम्ही आमचे द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्यास आणि दक्षिण आशियाई क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्यास पूर्णतः कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले.

‘माझा भाऊ तारिक…’; ममता बॅनर्जींकडून तारिक रहमान यांचे विशेष अभिनंदन..
बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ने (बीएनपी) मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बीएनपीचे अध्यक्ष तारिक रहमान यांचे अत्यंत जिव्हाळ्याच्या शब्दांत अभिनंदन केले असून, या विजयाला ‘शानदार यश’ असे संबोधले आहे.

ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तारिक रहमान यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या संदेशात त्यांनी रहमान यांचा उल्लेख “माझा भाऊ” असा केला. त्यांनी लिहिले की, “माझा भाऊ तारिक, तुमची संपूर्ण टीम आणि या विजयात सहभागी असलेल्या सर्वांचे बांगलादेशमधील या अभूतपूर्व यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.” मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी यावेळी बांगलादेशच्या जनतेच्या लोकशाही कौलाचा आदर करत, नवीन सरकारला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

द्विपक्षीय संबंधांची अपेक्षा
केवळ अभिनंदन करून न थांबता, ममता बॅनर्जी यांनी दोन्ही देशांमधील सौहार्दपूर्ण संबंधांवरही भर दिला. बांगलादेशने भारताशी नेहमीच सलोख्याचे आणि मैत्रीपूर्ण संबंध राखावेत, अशी आपली प्रामाणिक इच्छा असल्याचे त्यांनी नमूद केले. पश्चिम बंगाल आणि बांगलादेश यांच्यात सांस्कृतिक आणि भाषिक साधर्म्य असल्यामुळे, तेथील सत्तांतराचा परिणाम थेट सीमावर्ती राज्यांवर होत असतो. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

तारिक रहमान यांच्या विजयाबद्दल पाकिस्तानकडून देखील अभिनंदन
बांगलादेशमध्ये झालेल्या ऐतिहासिक सत्तांतराचे जगभरात पडसाद उमटत असून, आता पाकिस्ताननेही ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’च्या (बीएनपी) विजयाचे स्वागत केले आहे. पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी बीएनपीचे अध्यक्ष तारिक रहमान यांचे अभिनंदन करत, बांगलादेशच्या नवीन सरकारसोबत सहकार्य वाढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

लोकशाही कौलाचे स्वागत
अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी आपल्या अधिकृत संदेशात म्हटले आहे की, बांगलादेशच्या जनतेने निवडणुकीच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या लोकशाही आकांक्षांचा पाकिस्तान पूर्णतः आदर करतो. तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली बीएनपीने मिळवलेले यश हे बांगलादेशातील बदलत्या राजकीय प्रवाहाचे निदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले. “पाकिस्तान बांगलादेशातील लोकशाही प्रक्रियेचे समर्थन करतो आणि या यशाबद्दल तारिक रहमान व त्यांच्या पक्षाचे अभिनंदन करतो,” असे झरदारी यांनी म्हटले आहे.

संरक्षण आणि व्यापारावर लक्ष
केवळ शुभेच्छा देऊन न थांबता, झरदारी यांनी आगामी काळात उभय देशांमधील संबंधांना नवी उंची देण्याबाबत भाष्य केले. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील व्यापार, संरक्षण आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी पाकिस्तानचे नवीन सरकार अत्यंत उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः दक्षिण आशियाई क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्यावर त्यांनी भर दिला. संरक्षण क्षेत्रातील सहकार्य आणि आर्थिक देवाणघेवाण वाढवण्यासाठी नवीन सरकारसोबत एकत्रित काम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

मतदानात १७ टक्क्यांची मोठी वाढ; ५९.४४% मतदारांनी बजावला हक्क-
बांगलादेश निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, यावेळच्या निवडणुकीत एकूण ५९.४४% इतके विक्रमी मतदान झाले आहे. विशेष म्हणजे, २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत तब्बल १७ टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

निवडणूक आयोगाची अधिकृत घोषणा
निवडणूक आयोगाच्या जनसंपर्क विभागाचे संचालक एमडी रुहुल अमीन मलिक यांनी शुक्रवारी सकाळी ११:३० वाजता पत्रकार परिषदेत ही अंतिम आकडेवारी प्रसिद्ध केली. २०२४ मध्ये पार पडलेल्या मागील सार्वत्रिक निवडणुकीत केवळ ४१.८% मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला होता. त्या तुलनेत यंदा मतदारांमध्ये असलेला प्रचंड उत्साह हा सत्तांतराच्या दिशेने टाकलेले पाऊल मानले जात आहे.

आकडेवारी जाहीर करण्यास विलंब का झाला?
निवडणुकीचे निकाल आणि मतदानाची टक्केवारी गुरुवारी रात्रीच जाहीर होणे अपेक्षित होते; मात्र त्यास काही काळ विलंब झाला. या विलंबाचे कारण स्पष्ट करताना निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, बहुतांश मतदारसंघांमध्ये ‘पोस्टल बॅलेट’ (टपाल मतदान) मोजणीसाठी अनपेक्षितरीत्या जास्त वेळ लागला. कोणत्याही प्रकारची घाई करून चुकीची किंवा दिशाभूल करणारी आकडेवारी जाहीर होऊ नये, यासाठी आयोगाने अत्यंत सावधगिरी बाळगली आणि पूर्ण पडताळणीअंतीच ही आकडेवारी समोर आणली.

महिला उमेदवारांचा मर्यादित सहभाग, ७ महिलांचा विजय
बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ने (बीएनपी) मिळवलेल्या मोठ्या विजयासोबतच, संसदेत पोहोचणाऱ्या महिला प्रतिनिधींची आकडेवारीही समोर आली आहे. बांगलादेशातील प्रसिद्ध वृत्तपत्र ‘प्रथोम आलो’च्या अहवालानुसार, या निवडणुकीत आतापर्यंत सात महिला उमेदवारांनी विजय संपादन केला असून, त्यामध्ये बीएनपीच्या उमेदवारांचे वर्चस्व दिसून येत आहे.

विजयी उमेदवारांचे पक्षीय बलाबल-
निवडणूक आयोगाच्या प्राथमिक कलानुसार, विजयी झालेल्या सात महिला उमेदवारांची पक्षीय विभागणी-
बीएनपी (BNP): ५ जागा
बीएनपी मित्रपक्ष (आघाडी): १ जागा
अपक्ष: १ जागा

जरी या निवडणुकीत महिलांच्या सहभागाचे प्रमाण अल्प असले, तरी विजयी झालेल्या या सात महिलांनी आपापल्या मतदारसंघांत चुरशीची लढत देऊन आपले स्थान निर्माण केले आहे. यामध्ये ‘बीएनपी’च्या अफ्रोजा खानम रीटा (माणिकगंज-३), तहसिना रुश्दीर लुना (सिल्हेट-२) आणि रुमीन फरहाना (ब्रह्माणबारिया-२, अपक्ष) यांच्यासारख्या आक्रमक नेत्यांचा समावेश आहे.

सहभागाची अत्यल्प टक्केवारी
या निवडणुकीतील सर्वात चिंतेची बाब म्हणजे महिला उमेदवारांची घटलेली संख्या. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, एकूण १,९८१ उमेदवारांपैकी केवळ ७८ महिला निवडणुकीच्या रिंगणात होत्या. हे प्रमाण एकूण उमेदवारांच्या तुलनेत अत्यंत कमी (सुमारे ४ टक्क्यांहून कमी) आहे. बांगलादेशच्या राजकारणात गेल्या तीन दशकांपासून महिलांचे (शेख हसीना आणि खालिदा झिया) वर्चस्व असूनही, प्रत्यक्ष निवडणुकीत सामान्य महिला उमेदवारांची संख्या कमी असणे हा राजकीय विश्लेषकांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.

आरक्षित जागांचे महत्त्व
बांगलादेशच्या संसदेत (जातीय संसद) एकूण ३५० जागा आहेत, त्यापैकी ३०० जागांवर थेट निवडणूक होते, तर ५० जागा महिलांसाठी आरक्षित असतात. या आरक्षित जागांवर निवडून आलेले प्रतिनिधी राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार प्रमाणबद्ध पद्धतीने निवडले जातात. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीत जरी केवळ ७ महिला जिंकल्या असल्या, तरी आरक्षित जागांच्या भरतीनंतर संसदेतील महिलांची एकूण संख्या ५७ च्या पुढे जाईल.

हे देखील वाचा – Heart Health : फिट असूनही हार्ट अटॅक का येतो? ‘हे’ आहे धक्कादायक कारण

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या