Bangladesh Rape Case | बांगलादेशच्या कुमिल्ला जिल्ह्यात एका 21 वर्षीय हिंदू महिलेवर स्थानिक राजकारण्याने केलेल्या क्रूर बलात्काराच्या घटनेने देशभर संतापाची लाट उसळली आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांचा आक्रोश वाढला.
ढाका विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आरोपींवर तातडीने कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीसह पाच जणांना अटक केली असून, उच्च न्यायालयाने पीडितेच्या सुरक्षेसाठी तात्काळ पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत.
ही घटना कुमिल्लाच्या मुरादनगर उप-जिल्ह्यातील रामचंद्रापूर पाचकिट्टा गावात घडली. पीडितेचा पती दुबईत काम करतो, आणि ती आपल्या मुलांसह ‘हरी सेवा’ उत्सवासाठी वडिलांच्या घरी आली होती. 16 जुलै रोजी रात्री 10 च्या सुमारास मुख्य आरोपी फजूर अली याने घरात जबरदस्तीने प्रवेश करून तिच्यावर बलात्कार केला.
स्थानिकांनी अलीला पकडून मारहाण केली, पण पोलिसांच्या ताब्यात देण्याऐवजी त्याला रुग्णालयात नेण्यात आले, जिथून तो पळून गेला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत अलीला ढाक्यातील सायदाबाद येथे अटक केली. उर्वरित चार जणांना पीडितेचे फोटो आणि ओळख सोशल मीडियावर उघड केल्याप्रकरणी अटक करण्यात आली.
ढाक्यात निदर्शने आणि न्यायालयाचा हस्तक्षेप
या घटनेच्या निषेधार्थ ढाका विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये मोर्चा काढला. विशेषतः अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे वसतिगृह असलेल्या जगन्नाथ हॉलमधील विद्यार्थ्यांनी रॅली काढून न्यायाची मागणी केली.
बांगलादेश उच्च न्यायालयाने सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ तातडीने हटवण्याचे आणि पीडितेची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, पीडितेला आवश्यक वैद्यकीय उपचार देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.