Bangladesh Government | बांगलादेशच्या अंतरिम सरकारने (Bangladesh Government) एक महत्त्वाचा निर्णय घेऊन महिला सरकारी अधिकाऱ्यांना ‘सर’ असे संबोधण्याची जुनी सक्ती रद्द केली आहे. हा निर्णय सल्लागार परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला असून, सरकारने या प्रथेला सामाजिक आणि संस्थात्मकदृष्ट्या अनुचित ठरवले आहे.
‘सर’ संबोधनावर टीका आणि बदल
शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या 16 वर्षांच्या कार्यकाळात महिला अधिकाऱ्यांना ‘सर’ संबोधण्याचा नियम लागू करण्यात आला होता, जो नंतर सर्व स्तरांवर पसरला. मात्र, या प्रथेने अनेकांना अस्वस्थ केले होते.
मुख्य सल्लागार कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात हा नियम रद्द करण्याची घोषणा केली असून, योग्य संबोधनासाठी पुनरावलोकन समिती स्थापन करण्यात आली आहे.
सय्यदा रिझवाना हसन यांच्या नेतृत्वाखालील या समितीला एक महिन्यात शिफारसी सादर करायच्या आहेत. समिती कालबाह्य आणि गुंतागुंतीच्या प्रोटोकॉल नियमांचाही अभ्यास करेल. सरकारचा उद्देश सन्मानजनक आणि सामाजिक मूल्यांशी जुळणारी भाषा प्रस्थापित करणे हा आहे.
महिला अधिकाऱ्यांना ‘सर’ संबोधण्यावरून सातत्याने टीका होत होती. काहींना चुकीचे शीर्षक वापरण्याचा दबाव होता, तर काहींना योग्य संज्ञा वापरल्यावर उद्धटपणाचा सामना करावा लागला. आता समिती योग्य संबोधनासाठी शब्द सुचवणार आहेत.