Sheikh Hasina News: भारतात आश्रयाला असलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी दिल्लीत केलेल्या एका सार्वजनिक भाषणामुळे नव्या राजनैतिक वादाला तोंड फुटले आहे. हसीना यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात ऑडिओ माध्यमातून आपले मत मांडले.
ऑगस्ट 2024 मध्ये सत्ता सोडल्यानंतर त्यांचे हे पहिलेच सार्वजनिक भाषण होते. या प्रकारामुळे बांगलादेशच्या अंतरिम सरकारने “धक्का” बसल्याची प्रतिक्रिया दिली असून भारताकडे तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.
बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाचा आरोप
बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेख हसीना या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाद्वारे गुन्हेगार ठरवल्या गेल्या आहेत. अशा “फरार” व्यक्तीला भारताच्या राजधानीत भाषण करण्याची परवानगी देणे ही एक धोकादायक बाब आहे. यामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांवर गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशाराही ढाकाने दिला आहे.
बांगलादेशने हसीना यांच्या भाषणाला “द्वेषपूर्ण भाषण” असे संबोधले असून यामुळे देशातील लोकशाही प्रक्रियेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.
शेख हसीना यांनी भाषणात काय म्हटले?
78 वर्षीय शेख हसीना यांनी आपल्या भाषणात मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारवर जोरदार टीका केली. युनूस यांच्या काळात बांगलादेशमध्ये कधीही मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका होऊ शकणार नाहीत, असा दावा त्यांनी केला. बांगलादेशमध्ये 12 फेब्रुवारी रोजी निवडणुका होणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर हसीना यांचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
भारताची भूमिका आणि प्रत्यर्पण करार
बांगलादेश सरकारने भारताकडे शेख हसीना यांच्या प्रत्यर्पणाची मागणी वारंवार केली आहे. नोव्हेंबरमध्ये ढाका न्यायालयाने हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, भारताने अद्याप या हस्तांतरणाच्या विनंतीवर अधिकृत भाष्य केलेले नाही.
या वादावर भारताने म्हटले आहे की, एक जवळचा शेजारी म्हणून भारत बांगलादेशमधील शांतता, लोकशाही आणि स्थिरतेसाठी कटिबद्ध आहे आणि सर्व संबंधित घटकांशी सकारात्मक चर्चा करत राहील.
सध्याच्या या परिस्थितीमुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक वातावरण अधिक तणावपूर्ण झाले असून, आगामी निवडणुकांपर्यंत हे प्रकरण शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीत.









