बांगलादेशमध्ये पुन्हा राजकीय संकट! मुहम्मद युनूस राजीनामा देण्याची शक्यता, कारण काय?

Bangladesh's Muhammad Yunus Planning To Resign

Bangladesh’s Muhammad Yunus Planning To Resign | बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख प्रा. मुहम्मद युनूस (Muhammad Yunus) हे सध्या राजकीय पक्षांमध्ये आवश्यक एकमत न मिळाल्याने पदत्यागाचा गंभीर विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. नॅशनल सिटिझन पार्टीचे (NCP) प्रमुख निहिद इस्लाम (Nhid Islam) यांनी ही माहिती दिली.

इस्लाम यांनी सांगितले की, “मुहम्मद युनूस राजकीय असहमतीमुळे सध्या काम करणे अशक्य असल्याचे मानतात. त्यांनी मला स्पष्टपणे सांगितले की, राजकीय पक्षांमध्ये जर काही एकमत होत नसेल, तर मी काम कसे करणार?”

फेब्रुवारी 2025 मध्ये एनसीपीच्या उदयात युनूस यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांच्याच पाठिंब्यावरून इस्लाम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘विद्यार्थी-नेतृत्वातील जनआंदोलन’ पुढे नेले आणि माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीग सरकारची जागा घेतली.

युनूस यांच्याविरोधात राजकीय व लष्करी दबाव वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या दोन दिवसांत लष्कराच्याकाही गटांनी युनूस सरकारविरोधात नाराजी दर्शवली. मुहम्मद युनूस आणि बांगलादेश लष्करप्रमुखामध्येही तणाव पाहायला मिळत आहे. या गटांनी पूर्वी हसीना सरकारविरोधातील आंदोलनात महत्त्वाची भूमिका निभावली होती, पण सध्या त्यांनी युनूस यांच्याबाबत नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.

इस्लाम यांनी नमूद केले की, “युनूस यांना आम्ही देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि भविष्यासाठी खंबीर राहण्याची विनंती केली आहे. पण जर राजकीय सहमतीच मिळत नसेल, तर त्यांच्यासाठी पदावर राहणे कठीण आहे.”

सध्या एनसीपी आणि स्टुडंट्स अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन (SAD) या संघटनांमध्ये युनूस यांच्या राजीनाम्याच्या शक्यतेवर अंतर्गत चर्चा सुरू आहे. राजकीय पक्षांमध्ये सहमतीचं वातावरण निर्माण होत नसल्याने, युनूस यांचा पुढील निर्णय संपूर्ण बांगलादेशासाठी निर्णायक ठरू शकतो.