Bank Strike : भारतीय बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांच्या संघटनांनी पाच दिवसांचा कामाचा आठवडा लागू करण्याच्या मागणीसाठी संपाचे हत्यार उपसले आहे. 27 जानेवारी रोजी हा देशव्यापी संप पुकारण्यात आला असून, यामुळे देशभरातील सरकारी आणि खासगी बँकांच्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत.
संपाची वेळ आणि व्याप्ती
नऊ प्रमुख बँक संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ने (UFBU) या संपाची नोटीस दिली आहे. हा संप 26 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून सुरू होईल आणि 27 जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत सुरू राहील. भारतीय बँक संघ (IBA), मुख्य कामगार आयुक्त आणि वित्तीय सेवा विभागाला या संदर्भातील अधिकृत नोटीस पाठवण्यात आली आहे.
मुख्य मागणी काय आहे?
बँक कर्मचाऱ्यांची सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे सर्व शनिवार बँकांना सुट्टी जाहीर करून ‘पाच दिवसांचा आठवडा’ (5-Day Work Week) लागू करणे. सध्या बँकांना केवळ दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. 2015 सालापासून कर्मचारी ही मागणी करत आहेत. विशेष म्हणजे, बँक संघाने (IBA) आधीच या प्रस्तावाला संमती दर्शवली आहे आणि तशी शिफारस सरकारकडे पाठवली आहे. मात्र, गेल्या नऊ महिन्यांपासून सरकार आणि नियामकांकडून या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळालेली नाही.
कामाच्या वेळेत बदलाची तयारी
कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, आठवड्यातील कामाचे दिवस पाच झाले तरी ग्राहकांची गैरसोय होऊ दिली जाणार नाही. यासाठी दररोजच्या कामाची वेळ सुमारे 40 मिनिटांनी वाढवण्यास संघटनांनी संमती दिली आहे. जेणेकरून आठवड्यातील एकूण कामकाजाचे तास कमी होणार नाहीत. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या या विषयावर ठोस प्रगती होत नसल्याने कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
या संपामुळे चेक क्लिअरन्स, रोख रक्कम काढणे आणि जमा करणे तसेच इतर महत्त्वाच्या बँक सेवा विस्कळीत होऊ शकतात. ग्राहकांनी 27 जानेवारीपूर्वी आपली बँकेची महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत, असा सल्ला दिला जात आहे.









