Bareilly Internet Ban : उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात दसऱ्याच्या (Dussehra) उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली होती. ‘आय लव्ह मुहम्मद’ पोस्टरवरील वादामुळे झालेल्या दगडफेकीनंतर निर्माण झालेल्या तणावामुळे, राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून बरेली जिल्ह्यामध्ये 48 तासांसाठी इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
रस्त्यांवर पोलीस, पीएसी (PAC) आणि आरएएफ (RAF) चे जवान तैनात करण्यात आले असून, आकाशातून ड्रोनद्वारे संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.
बरेलीत 48 तास इंटरनेट बंद
गृह विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, बरेलीमध्ये मोबाईल इंटरनेट, ब्रॉडबँड आणि एसएमएस (SMS) सेवा 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजल्यापासून ते 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत स्थगित राहतील. गृह सचिव गौरव दयाल यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, अफवा पसरवण्यासाठी आणि सामुदायिक तणाव वाढवण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
चार जिल्ह्यांत हाय अलर्ट जारी
विभागीय आयुक्त भूपेंद्र एस चौधरी यांनी बरेली विभागातील बरेली, शाहजहांपूर, पिलीभीत आणि बदायूं या चार जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे. रामलीला मैदान, दुर्गा पूजा मेळावे आणि रावण दहन कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने, पोलिसांनी या ठिकाणी विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सर्व जिल्हा दंडाधिकारी, पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी गंभीरपणे पार पाडावी, अन्यथा गंभीर कारवाई केली जाईल, असा इशारा चौधरी यांनी दिला आहे.
गुप्तचर यंत्रणांनाही सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले असून, संवेदनशील ठिकाणी सशस्त्र पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. 26 सप्टेंबर रोजी बरेलीत झालेले गालबोट शेजारच्या जिल्ह्यांमध्ये पसरू नये, यासाठी ‘फूलप्रूफ’ व्यवस्था केली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
हिंसाचाराचे मूळ कारण आणि कारवाई
26 सप्टेंबर रोजी कोतवाली भागात ‘आय लव्ह मोहम्मद’ (‘I Love Muhammad’) पोस्टर लावून इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिलचे (IMC) प्रमुख मौलाना तौकीर रझा खान यांनी मोर्चाचे आवाहन केले होते. शुक्रवारी नमाजनंतर मशिदीबाहेर सुमारे 2,000 लोक जमले होते. मौलाना यांच्या अनुपस्थितीत जमावाला हिंसक वळण लागले, ज्यामुळे दुकाने आणि वाहनांची तोडफोड झाली.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या. या चकमकीत 22 पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी 10 एफआयआर (FIR) दाखल केले असून, त्यात 125 जणांना आरोपी बनवले आहे, तसेच सुमारे 3,000 अज्ञात व्यक्तींचा समावेश आहे. मौलाना तौकीर रझा यांच्यावर सात प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बुधवारपर्यंत या प्रकरणी 81 जणांना अटक करण्यात आली आहे.
हे देखील वाचा – दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा महिलांना मोठा शब्द; ‘लाडकी बहीण योजने’बद्दल म्हणाले…