Basava Raju Encounter | छत्तीसगडमध्ये भारतीय सुरक्षा दलांनी काल (21 मे) 50 तासांहून अधिक काळ चाललेल्या मोठ्या नक्षलविरोधी कारवाईत टॉप माओवादी कमांडर बसव राजू (Basava Raju) उर्फ नंबाला केशवा राव (Nambala Keshava Rao)याला ठार केले.
ही कारवाई नारायणपूर जिल्ह्यातील माड (Maad) भागात झाली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या भीषण जंगलातील चकमकीत किमान 26 नक्षलवादी ठार झाले असून, यात काही उच्चपदस्थ कमांडरचाही समावेश असू शकतो.
राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी सांगितले की, “या कारवाईत एक पोलीस समर्थक शहीद झाला असून एक जवान जखमी झाला आहे.” चकमक अबुझमाड आणि इंद्रावती राष्ट्रीय उद्यान यांच्या सीमेलगतच्या घनदाट जंगलात घडली.
बसव राजू कोण होता?
बसव राजू, जो नंबाला केशवा राव या नावानेही ओळखला जात होता, तो 2003 मध्ये आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांच्यावर झालेल्या अलिपिरी बॉम्ब हल्ल्याचा (Alipiri bomb attack) मुख्य सूत्रधार होता.
2010 मध्ये दंतेवाडा हल्ल्यात (Dantewada attack) 76 सीआरपीएफ (CRPF) जवानांचा मृत्यू झाला होता, ज्यामागेही राजूची भूमिका होती. 2018 मध्ये माओवादी कमांडर गणपती याच्या राजीनाम्यानंतर, तो पक्षाचा सर्वोच्च कमांडर बनला.
तो गनिमी युद्धनीती आणि IEDs लावण्यात तज्ज्ञ होता. त्याचे शिक्षण वारंगल आरईसी मधून अभियांत्रिकीमध्ये झाले होते आणि एम.टेक करत असताना तो नक्षल चळवळीत सामील झाला. त्याचे वडील शिक्षक होते.
छत्तीसगडमध्ये ‘ब्लॅक फॉरेस्ट’ ऑपरेशन
या कारवाईपूर्वी, CRPF आणि राज्य पोलिसांनी 20 एप्रिल ते 11 मे दरम्यान ‘ब्लॅक फॉरेस्ट’ (Black Forest) नावाचे संयुक्त ऑपरेशन छत्तीसगड-तेलंगणा सीमेलगतच्या कर्रेगुट्टालू टेकड्यांवर राबवले होते.
या 21 दिवसांच्या ऑपरेशनमध्ये, 16 महिलांसह 31 नक्षलवादी ठार करण्यात आले. यावेळी 21 वेगवेगळ्या चकमकी झाल्या आणि 35 शस्त्रे जप्त करण्यात आली. हा परिसर नक्षलवाद्यांचा दिवसेंदिवस अधिक बळकट होणारा अड्डा मानला जात होता.