कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय, बंगळुरू चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना 10 ऐवजी 25 लाखांची मदत देणार

Bengaluru Stadium Stampede

Bengaluru Stadium Stampede | आरसीबीच्या विजयानंतर आयोजित कार्यक्रमादरम्यान बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा कर्नाटक सरकारने केली होती. मात्र, ही नुकसानभरपाई आता 10 लाखांवरून थेट 25 लाख रुपये करण्यात आली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ही घोषणा केली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाच्या आयपीएल 18 विजयानंतर आयोजित सत्कार समारंभादरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली होती. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर 2 ते 3 लाखांच्या आसपास चाहत्यांची गर्दी जमली होती, आणि योग्य व्यवस्थापन नसल्यामुळे गोंधळात चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत किमान 11 लोकांचा मृत्यू झाला, तर 56 जण गंभीर जखमी झाले.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी निवेदनात म्हटले आहे की, “दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना आता प्रत्येकी 25 लाखांची नुकसानभरपाई दिली जाईल. याआधी ही रक्कम 10 लाख इतकी होती.” ही रक्कम RCB संघाने घोषित केलेल्या प्रत्येकी 10 लाख रुपयांच्या मदतीव्यतिरिक्त आहे.

तसेच, RCBने जखमींसाठी एक स्वतंत्र मदत निधी उभारण्याची घोषणाही केली आहे.

घटनेबाबत नोंदवण्यात आलेल्या एफआयआरमध्ये RCB, आयोजक कंपनी DNA एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) यांच्यावर गर्दी व्यवस्थापन व सुरक्षेतील त्रुटींचा ठपका ठेवण्यात आला आहे. तिकिटांशिवाय प्रवेश मिळेल, अशी दिशाभूल करणारी माहिती सोशल मीडियावर पसरल्याने जमलेली गर्दी अधिक बेकाबू झाली होती.

या प्रकरणात अजून कोणतीही दंडात्मक कारवाई झाली नसली, तरी KSCA चे सचिव ए. शंकर आणि कोषाध्यक्ष ई. जयराम यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने सध्या संबंधित संस्थांवर दंडात्मक कारवाईला स्थगिती दिली आहे.