Bihar Election : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात जोरदार केली आहे. मुजफ्फरपूर येथे आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्यासमवेत आयोजित केलेल्या संयुक्त रॅलीत बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर “मत मिळवण्यासाठी काहीही करण्याची तयारी” असल्याचा आरोप करत टीकास्त्र सोडले.
तुम्ही नरेंद्र मोदींना तुमच्या मतांसाठी नाचायला सांगितले, तर ते व्यासपीठावर नाचतील”, अशा शब्दात राहुल गांधींनी टीका केली.
छठ पूजेवरून मोदींवर निशाणा
राहुल गांधी यांनी बिहारमधील सर्वात मोठा सण असलेल्या छठ पूजेचा संदर्भ देत पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला. त्यांनी दिल्लीतील प्रदूषित यमुनेमध्ये भक्त पूजा करत असताना, पंतप्रधान मोदी यांनी एका “विशेष बनवलेल्या” तलावात स्नान केल्याच्या विरोधाभासावर बोट ठेवले.
“नरेंद्र मोदी त्यांच्या स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करायला गेले. त्यांना यमुना नदीशी काही देणेघेणे नाही. त्यांना छठ पूजेशी काही देणेघेणे नाही. त्यांना फक्त तुमचे मत हवे आहे,” असे राहुल गांधी म्हणाले.
#BiharElection2025 | Muzaffarpur, Bihar: Lok Sabha LoP Rahul Gandhi says, "… There's no Yamuna there; there's a pond there. Narendra Modi went to bathe in his swimming pool. He has nothing to do with the Yamuna. He has nothing to do with Chhath Puja. He just wants your vote. If… pic.twitter.com/rCR5jHxhyH
— ANI (@ANI) October 29, 2025
‘रिमोट कंट्रोल’ भाजपकडे
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 20 वर्षे राज्याची सत्ता सांभाळली असूनही मागासलेल्या वर्गासाठी काहीही केले नाही, असा आरोप करत राहुल गांधी यांनी भाजप नितीश कुमारांच्या प्रतिमेचा वापर राज्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करत असल्याचा दावा केला. “नितीशजींचा चेहरा वापरला जात आहे. रिमोट कंट्रोल भाजपच्या हातात आहे. तुम्हाला वाटू नये की तिथे अतिमागासलेल्या लोकांचा आवाज ऐकला जातो. भाजपच्या हातात रिमोट कंट्रोल आहे आणि त्यांना सामाजिक न्यायशी काहीही देणेघेणे नाही,” असे ते म्हणाले.
मत चोरीचा आरोप:
राहुल गांधी यांनी आपला ‘मत चोरीचा’ आरोप पुन्हा एकदा केला आणि बिहारमध्येही असाच प्रयत्न होऊ शकतो, असा इशारा दिला. ते म्हणाले, “ते तुमचे मत चोरण्यात व्यस्त आहेत. त्यांनी महाराष्ट्रात निवडणुका चोरल्या, हरियाणात निवडणुका चोरल्या आणि ते बिहारमध्येही सर्वोत्तम प्रयत्न करतील.”
बिहारमध्ये मतदार यादी पुनरिक्षण दरम्यान सुमारे 66 लाख नावे वगळण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी मतदारांना महागठबंधनला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आणि सर्वसमावेशक सरकारचे आश्वासन दिले.
भाजपचा पलटवार:
राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी जोरदार पलटवार केला. त्यांनी राहुल गांधींवर छठ पूजेच्या भावनांचा अपमान केल्याचा आरोप केला. त्यांनी राहुल गांधी, तेजस्वी यादव आणि महागठबंधनच्या नेत्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. “राहुल गांधी सनातन धर्म, लोकउत्सव आणि बिहारच्या विरोधात आहेत. त्यांच्या मनात असलेला द्वेष त्यांच्या क्रोधात व्यक्त झाला आणि त्यांनी जाणूनबुजून बिहारच्या सणांचा अपमान केला,” असे मालवीय म्हणाले.
दरम्यान, 243 सदस्य असलेल्या बिहार विधानसभेसाठी 6 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यांत मतदान होणार आहे, तर मतमोजणी 14 नोव्हेंबर रोजी होईल.









