Home / देश-विदेश / ‘…तर पाकिस्तान युद्ध पुकारेल’, बिलावल भुट्टोची भारताला पोकळ धमकी

‘…तर पाकिस्तान युद्ध पुकारेल’, बिलावल भुट्टोची भारताला पोकळ धमकी

Bilawal Bhutto War Threat

Bilawal Bhutto War Threat : पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी अमेरिकेतून भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली होती. त्यानंतर आता पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी (Bilawal Bhutto Zardari) यांनीही पुन्हा एकदा युद्धाची धमकी दिली आहे.

एका कार्यक्रमात बिलावल म्हणाले की, जर भारताने सिंधू जल करार रद्द केला, तर पाकिस्तान युद्ध पुकारेल, असा इशारा दिला. बिलावल भुट्टो यांनी आरोप केला की, सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानपासून दूर वळवणे म्हणजे देशाच्या, विशेषतः सिंध प्रांताच्या इतिहासावर, संस्कृतीवर आणि सभ्यतेवर हल्ला करण्यासारखे आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 1960 चा हा करार स्थगित केला होता.

रिपोर्टनुसार बिलावल म्हणाले, “जर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधू नदीवर पाणी प्रकल्पाची घोषणा करत असतील, तर ते आपल्या इतिहासावर, संस्कृतीवर आणि सभ्यतेवर हल्ला करत आहेत.”

सिंधू नदीच्या पाणीवाटपावरून संघर्ष

बिलावल भुट्टो यांनी दावा केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधू नदीवर पाणी प्रकल्पाची घोषणा करणे, म्हणजे पाकिस्तानच्या पाणीपुरवठ्यावर मर्यादा आणण्याचा इशारा आहे. बिलावल यांच्या म्हणण्यानुसार, ही ‘पाण्याची आक्रमकता’ भारताच्या नुकसानीचा बदला आहे. सिंधू नदीला धोका आहे असे वाटेल तेव्हा सिंध प्रांताचे लोक नेहमीच पुढे येऊन तिचा बचाव करतील, असेही त्यांनी म्हटले.

ते पुढे म्हणाले, “जर युद्ध झाले, तर मोदींना सामोरे जाण्याची ताकद पाकिस्तानच्या लोकांमध्ये आहे.” त्यांनी भारताला इशारा दिला की, “जर पुन्हा युद्ध झाले, तर पाकिस्तान आपल्या सहा नद्या परत मिळवेल.”

या आधी जनरल असीम मुनीर यांनी अमेरिकेतील पाकिस्तानी समुदायाला संबोधित करताना भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली होती. “आम्ही अण्वस्त्रधारी देश आहोत. जर आम्हाला वाटले की आम्ही बुडत आहोत, तर आम्ही अर्ध्या जगाला घेऊन बुडू,” असे मुनीर म्हणाले होते.

यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सडेतोड उत्तर दिले आहे की, “पाकिस्तानची अण्वस्त्र धमकी देण्याची जुनी सवय आहे आणि अशा धमक्यांना भारत बळी पडणार नाही. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील.”