Vijay thalapathy:अभिनेता आणि तमिळगा वेट्टी कझगम (टीव्हीके) पक्षाचे प्रमुख विजय थलापती (vijay thalapathy) यांच्या करूर येथील सभेतील चेंगराचेंगरीतल्या मृतांची संख्या वाढून ४१ झाली आहे. मृतांमध्ये १८ महिला, १३ पुरुष आणि १० मुलांचा समावेश आहे. या चेंगराचेंगरीने राज्याला हादरवले असतानाच आज पहाटे थलापती यांच्या चेन्नईतील नीलंकराई निवासस्थानी बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे.
धमकीचा इशारा मिळताच चेन्नई पोलिसांनी तातडीने थलापतीच्या घराची तपासणी केली. पण कोणतीही आक्षेपार्ह वस्तू आढळली नाही. त्यामुळे हा खोडसाळपणा असल्याचे स्पष्ट झाले. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. टीव्हीकेने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेत या प्रकरणाची सीबीआय किंवा विशेष तपास पथकाकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे. याचिकेवर आज सुनावणी होणार होती. पण ती पुढे ढकलण्यात आली. आता पुढील सुनावणी शुक्रवारी होण्याची शक्यता आहे.
शनिवारी सायंकाळी घडलेल्या या चेंगराचेंगरी प्रकरणात टीव्हीकेच्या प्रमुख नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील माहिती आज समोर आली आहे. त्यानुसार, थलापती यांचे सभास्थळी उशिरा येणे आणि परवानगीशिवाय रोडशो केल्याने चेंगराचेंगरी झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सभेला गर्दी जमवण्यासाठी थलापती हे उशिरा पोहोचले. थलापती हे सभेसाठी सायंकाळी ४.४५ मिनिटाला जिल्ह्याच्या सीमेवर पोहोचले. पण पुढे जाण्यास विलंब केला. तसेच परवानगीशिवाय रोड शो केला. आणि शेवटी सात वाजता ते सभास्थळी पोहोचले. त्यामुळे हजारो लोकांना उन्हातान्हातच ताटकळत उभे राहावे लागले. यातूनच चेंगराचेंगरीचा प्रकार उद्भवला, असा एफआयआरमध्ये दावा करण्यात आला आहे.
चेंगराचेंगरीच्या घटनेने तमिळनाडूचे राजकारण तापले आहे. टीव्हीकेने ही घटना निव्वळ अपघात नसून राजकीय षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप केला आहे. थलापती यांनी सभेत माजी मंत्री सेंथिल बालाजी यांच्याविरोधात बोलत होते, तेवढ्यात जाणूनबुजून वीजपुरवठा खंडित करण्यात आला आणि जमावावर चपला फेकण्यात आल्या. गोंधळाचा फायदा घेत पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोपही पक्षाने केला आहे.
दरम्यान, तामिळनाडू सरकारने मात्र वीज खंडित झाली नसल्याचा दावा केला आहे. केवळ पक्षाच्या जनरेटरमधील बिघाडामुळे लाईट्स मंद झाल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. सार्वजनिक सुरक्षिततेसाठी वीज खंडित करण्याची टीव्हीकेने केलेली विनंती फेटाळण्यात आल्याचेही प्रशासनाने सांगितले.
आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही करूर येथे पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले आहे. तसेच घटनास्थळाचीही पाहणी केली. मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी आज व्हिडिओ संदेश शेअर केला. अफवा आणि खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
‘या’ गाडीचा भारतीय बाजारात धुमाकूळ; तब्बल 30,000 युनिट्सची रेकॉर्डब्रेक विक्री, किंमतही झाली कमी