Brain-Eating Amoeba | ‘नेग्लेरिया फाउलेरी’ (Naegleria fowleri) या ‘मेंदू खाणाऱ्या’ (Brain-eating Amoeba) अमिबाने पुन्हा एकदा कहर केला आहे. अमेरिकेतील टेक्सास (Texas) राज्यात या जीवघेण्या अमिबाने एका 71 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. गेल्याकाही वर्षात या मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
सीडीसीच्या रिपोर्टनुसार, ही 71 वर्षीय महिला निरोगी होती, पण टेक्सास कॅम्पसाईटवर (Texas Campsite) नळाचे पाणी नाक स्वच्छ करण्यासाठी वापरल्यानंतर चार दिवसांनी तिला तीव्र न्यूरोलॉजिकल लक्षणे जाणवू लागली. यात ताप, डोकेदुखी आणि मानसिक स्थितीत बदल यांचा समावेश होता.
या महिलेने पोहण्यासाठी किंवा गोड्या पाण्यात वेळ घालवला नव्हता. परंतु, आजारी पडण्यापूर्वीच्या चार दिवसांत तिने नळातील न उकळलेले पाणी काही वेळा नाक स्वच्छ करण्यासाठी वापरले होते.
‘प्रायमरी अमिबिक मेनिंगोएन्सेफलायटिस’ संसर्गावर वैद्यकीय उपचार (Medical Treatment) करूनही, रुग्णाला झटके आले आणि लक्षणे सुरू झाल्यानंतर 8 दिवसांनी तिचा मृत्यू झाला. सीडीसीने केलेल्या चाचण्यांमध्ये तिच्या ‘सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड’मध्ये नेग्लेरिया फाउलेरी’ हा अमिबा आढळल्याची माहिती दिली.
नेग्लेरिया फाउलेरी म्हणजे काय?
‘नेग्लेरिया फाउलेरी’ला सामान्यतः “मेंदू खाणारा अमिबा” म्हणून ओळखले जाते. हा अमिबा ‘प्रायमरी अमिबिक मेनिंगोएन्सेफलायटिस’ (PAM) या अत्यंत घातक रोगास कारणीभूत ठरतो, ज्यामध्ये मृत्यूदर सुमारे 98 टक्के आहे. हा अमिबा उष्ण गोड्या पाण्याच्या वातावरणात, जसे की तलाव, नद्या आणि गरम झऱ्यांमध्ये वाढतो. दूषित पाणी नाकातून शरीरात गेल्यास याचा संसर्ग होतो.
एकदा शरीरात प्रवेश केल्यावर, हा अमिबा मेंदूपर्यंत (Brain) पोहोचतो, जिथे तो मेंदूच्या ऊतींचा नाश करतो, ज्यामुळे न्यूरोलॉजिकल कार्यक्षमतेत वेगाने घट होते.
नेग्लेरिया फाउलेरीची लक्षणे काय आहेत?
‘प्रायमरी अमिबिक मेनिंगोएन्सेफलायटिस’ची (PAM)लक्षणे डोकेदुखी, ताप, मळमळ आणि उलटीने सुरू होतात, त्यानंतर मान ताठ होणे, गोंधळ, झटके आणि भ्रम अशी लक्षणं जाणवतात. शेवटी काही दिवसांत कोमा आणि मृत्यू होतो.
हा अमिबा थंड, क्लोरीनयुक्त किंवा स्वच्छ पाण्यात टिकू शकत नाही, ज्यामुळे अशा परिस्थितीत संसर्गाचा धोका कमी होतो. अमिबा असलेले पाणी गिळल्याने ‘नेग्लेरिया फाउलेरी’चा संसर्ग होत नाही. तसेच, तुम्हाला एका व्यक्तीकडून दुसऱ्याला संसर्ग होत नाही.