BRICS Summit Condemns Pahalgam Attack | ब्राझीलमधील रिओ डी जनेरियो येथे BRICS शिखर परिषदेतील (BRICS Summit) सदस्य देशांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Attack) दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. पहलगाम येथील हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता.
BRICS ने दहशतवादाविरोधात ‘शून्य सहिष्णुता’ धोरण स्वीकारत दुहेरी मापदंड नाकारण्याचे आवाहन केले. परिषदेत दहशतवादी वित्तपुरवठा, सीमेपलीकडील हालचाल आणि जागतिक व्यापारावरील शुल्क वाढीच्या परिणामांवरही चर्चा झाली.
ब्रिक्स परिषदेने ‘रिओ डी जनेरियो घोषणापत्रात पहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि इस्त्रायलच्या इराणवरील हल्ल्याचा निषेध केला आहे.
पहलगाम हल्ल्याचा निषेध
‘रिओ डी जनेरियो घोषणापत्रात’ BRICS नेत्यांनी दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा निषेध केला आहे. “आम्ही पहलगाम हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो. दहशतवादी हालचाल, वित्तपुरवठा आणि सुरक्षित आश्रयस्थानांविरोधात एकजुटीने कारवाई करू,” असे घोषणापत्रात नमूद आहे.
समूहाने संयुक्त राष्ट्रांच्या चौकटीत आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील सर्वसमावेशक करार लवकर अंतिम करण्याची मागणी केली. दहशतवादाला गुन्हेगारी आणि अन्यायकारक ठरवत, त्याची कोणतीही प्रेरणा अस्वीकार्य असल्याचे सांगितले.
BRICS ने दहशतवादाविरोधी सहकार्य मजबूत करण्याचा संकल्प व्यक्त केला. मनी लाँडरिंग, दहशतवादी वित्तपुरवठा आणि क्रिप्टोकरन्सीच्या दुरुपयोगासारख्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीविरोधात कठोर कारवाईची गरज मांडली. “दहशतवादाचा सामना करण्याची प्राथमिक जबाबदारी देशाचंी आहे आणि ही लढाई आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करत व्हावी,” असे घोषणापत्रात स्पष्ट केले आहे.
जागतिक व्यापार आणि शुल्क वाढ
परिषदेत अमेरिकेच्या रेसिप्रोकल शुल्कांवर अप्रत्यक्ष टीका करत, BRICS ने शुल्क वाढीमुळे जागतिक व्यापार आणि पुरवठा साखळीवर होणाऱ्या परिणामांबाबत चिंता व्यक्त केली. “एकतर्फी शुल्क आणि गैर-शुल्क उपाय जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांशी विसंगत आहेत,” असे समूहाने म्हटले. नियम-आधारित, पारदर्शक आणि समान बहुपक्षीय व्यापार प्रणालीला पाठिंबा देण्याची हमी दिली.
BRICS ने इराणवरील लष्करी हल्ल्यांचा देखील निषेध केला. तसेच, नागरी पायाभूत सुविधांवर आणि शांततापूर्ण अणु सुविधांवरील हल्ल्यांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली.