केरळमध्ये अडकलेल्या F-35B फायटर जेटची दुरुस्ती अशक्य, आता ब्रिटन तुकडे करून परत घेऊन जाण्याची शक्यता

UK F-35B Stealth Jet

UK F-35B Stealth Jet | ब्रिटिश F-35B स्टील्थ फायटर जेट (F-35B Stealth Jet) मागील जवळपास 20 दिवसांपासून केरळमधील तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडकून पडले आहे. तांत्रिक बिघाडामुळे 15 जून 2025 रोजी या विमानाने आपत्कालीन लँडिंग केली होती.

तांत्रिक बिघाडामुळे आता भारतात याची दुरुस्ती शक्य नाही. ब्रिटनमधील इंजिनिअर्सच्या टीमने भारतात जेट दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यात यश आले नाही.

रिपोर्टनुसार, दुरुस्तीचे प्रयत्न अयशस्वी झाल्याने ब्रिटन आता C-17 ग्लोबमास्टर या मालवाहू विमानाने हवाई मार्गाने हलवण्याचा विचार करत आहे

आपत्कालीन लँडिंगचे कारण

15 जून रोजी भारत-यूके नौदल सरावानंतर प्रतिकूल हवामानामुळे F-35B फायटर जेट विमानवाहू नौका HMS प्रिन्स ऑफ वेल्सवर उतरू शकले नाही. कमी इंधन पातळीमुळे वैमानिकाने तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केली. “सुरक्षिततेला प्राधान्य देत विमान भारतात वळवण्यात आले,” असे ब्रिटिश उच्चायुक्तांनी सांगितले होते. मात्र, लँडिंगनंतर इंजिनियरिंग समस्येमुळे विमान उड्डाण करू शकत नाही.

रॉयल नेव्हीने युनायटेड किंगडममधून विशेष इंजिनिअर्सची टीम आणि प्रगत दुरुस्ती उपकरणे पाठवली, परंतु तांत्रिक बिघाड सोडवता आला नाही. भारतीय हवाई दलाच्या समन्वयाने विमानतळ अधिकाऱ्यांनी विमानाला MRO हँगरमध्ये हलवण्याची तयारी केली होती.

“दुरुस्तीच्या वेळेबाबत ठोस माहिती नाही, पण स्थानिक कामकाजात कमीत कमी व्यत्यय येईल याची खात्री करत आहोत,” असे उच्चायुक्तांनी नमूद केले. आता दुसरा पर्याय म्हणून C-17 ग्लोबमास्टर या मालवाहू विमानाद्वारे या फायटर जेटला हवाई मार्गाने परत घेऊन जाण्याचा विचार सुरू आहे.

केरळ पर्यटन विभागाची मिश्किल टिप्पणी

मागील अनेक दिवसांपासून हे विमान केरळमध्ये अडकल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. केरळ पर्यटन विभागाने देखील या घटनेवर हलक्या-फुलक्या अंदाजात एक्सवर पोस्ट केली, “केरळ, जिथून कोणालाही निघावेसे वाटत नाही, अगदी F-35B लाही!”, अशी पर्यटकांना उद्देशून मजेशीर पोस्ट केली. या पोस्टवर यूजर्सने देखील गमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.