Bryan Johnson | अमेरिकेतील तंत्रज्ञान उद्योजक ब्रायन जॉन्सन (Bryan Johnson) यांनी पुन्हा एकदा त्यांच्या विचित्र आरोग्य प्रयोगामुळे सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. मृत्यूला हरवण्यासाठी आणि दीर्घायुष्य मिळवण्यासाठी विविध जैववैद्यकीय प्रयोग करणारे जॉन्सन यांनी नुकतीच त्यांच्या शरीरातील संपूर्ण प्लाझ्मा (plasma) काढून टाकून त्याऐवजी अल्ब्युमिन भरल्याचा दावा केला आहे.
एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये जॉन्सन यांनी सांगितले की, “मी माझ्या शरीरातील सर्व प्लाझ्मा काढून टाकला. डॉक्टरांनी तो आतापर्यंत पाहिलेला सर्वात स्वच्छ प्लाझ्मा असल्याचे सांगितले.” हा त्यांच्या दीर्घायुष्यविषयक प्रयोगाचा दुसरा टप्पा होता. यापूर्वी त्यांनी आपल्या मुलाकडून रक्त संक्रमण करून घेतले होते.
ते पुढे म्हणाले, “तुम्हाला ते ‘ब्लड बॉय’ प्रकरण आठवतंय? तेव्हा माझ्या मुलाने मला प्लाझ्मा दिला होता. आज आम्ही त्याचाच दुसरा प्रयोग करत आहोत.”
दुसऱ्या व्हिडिओत त्यांनी स्पष्ट केले की, “आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याची क्षमता असते. पण कधी कधी आपल्या आधुनिक जीवनशैलीमुळे ते शरीरावर परिणाम करू शकते. म्हणून ही प्रक्रिया केली.”
ते पुढे म्हणाले, “मी संपूर्ण प्लाझ्मा काढला. काहीही वेगळं वाटलं नाही. मी झोपलो आणि उठलो, सगळं नेहमीसारखंच होतं. पण ज्या लोकांना आरोग्य समस्या आहेत, त्यांना ऊर्जा आणि जागरूकतेचा मोठा फरक जाणवू शकतो.”
जॉन्सन यांच्या म्हणण्यानुसार, ‘ब्लूप्रिंट’ नावाच्या आरोग्य योजनेअंतर्गत त्यांनी डझनभर बायोमार्कर्स मोजले जात आहेत. यातूनच कळेल की हे प्रयोग माझ्या दीर्घायुष्यासाठी किती फायदेशीर आहेत.”
$2 दशलक्ष खर्च आणि कडक जीवनशैली:
नेहमी चिरतरूण दिसण्याच्या ध्यासापोटी जॉन्सन दरवर्षी सुमारे $2 दशलक्ष वैद्यकीय निदान आणि उपचारांवर खर्च करतात. त्यांचं खाणं, झोपणं आणि व्यायाम करणं हे सगळं एक अत्यंत काटेकोर आणि वैज्ञानिक पद्धतीने नियोजित असतं.
त्यांनी वयाच्या 30 व्या वर्षी आपली पेमेंट प्रोसेसिंग कंपनी eBay ला विकली आणि त्यातून मिळालेल्या संपत्तीचा उपयोग आता शरीराच्या जैविक प्रक्रियांवर संशोधन करण्यासाठी करत आहेत.