Case Over Auntie Remark In UK : कार्यस्थळावरील भाषेचा वापर आणि सहकाऱ्यांशी वागताना राखली जाणारी सभ्यता या विषयावर लंडनमधील एका न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. केवळ ‘आंटी’ (काकू) म्हणून संबोधल्यामुळे आपल्या आत्मसन्मानाला ठेच लागली आणि भावना दुखावल्या गेल्या, असा दावा करणाऱ्या एका परिचारिकेच्या (नर्स) बाजूने न्यायालयाने निकाल दिला आहे. या प्रकरणाची दखल घेत न्यायालयाने संबंधित संस्थेला पीडित महिलेला सुमारे १ लाख ८० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
कामाच्या ठिकाणी ‘आंटी’ संबोधनावरून छळ; भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याला नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश-
लंडन: कार्यस्थळावरील भाषेची मर्यादा आणि सहकाऱ्यांशी वागताना राखली जाणारी व्यावसायिक सभ्यता यांबाबत लंडनच्या एका न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. वेस्ट लंडन एनएचएस (NHS) ट्रस्टमध्ये कार्यरत असलेल्या भारतीय वंशाच्या आरोग्य सहाय्यिका इल्डा एस्टेव्हेस यांना एका सहकाऱ्याने वारंवार ‘आंटी’ (काकू) म्हणून संबोधल्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्याचे न्यायालयाने मान्य केले आहे. याप्रकरणी रोजगार न्यायालयाने संबंधित संस्थेला एस्टेव्हेस यांना सुमारे १ लाख ८० हजार रुपयांची (साधारण १८०० पौंड) नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
वयावर आधारित भेदभावाचा ठपका-
या प्रकरणाची सुनावणी ‘वॉटफर्ड एम्प्लॉयमेंट ट्रिब्युनल’मध्ये पार पडली. ६४ वर्षीय इल्डा एस्टेव्हेस यांनी न्यायालयात आपली बाजू मांडताना सांगितले की, त्यांचे सहकारी चार्ल्स ओपोंग यांनी त्यांच्या वारंवारच्या नकारानंतरही त्यांना ‘आंटी’ असे संबोधणे सुरूच ठेवले. रोजगार न्यायाधीश ॲलिओट यांनी या वर्तणुकीवर कडक ताशेरे ओढले असून, हा प्रकार केवळ अनौपचारिक संवाद नसून वय आणि लिंगाच्या आधारे केलेला मानसिक छळ असल्याचे स्पष्ट केले. एखाद्या व्यक्तीला तिच्या इच्छेविरुद्ध वयाची जाणीव करून देणाऱ्या शब्दांनी वारंवार संबोधणे हे व्यावसायिक शिष्टाचाराच्या विरोधात असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
अयोग्य टिप्पणी आणि मानसिक क्लेश-
एस्टेव्हेस यांनी आपल्या तक्रारीत एका गंभीर घटनेचा उल्लेख केला. जून २०२३ मध्ये, जेव्हा त्या ६१ वर्षांच्या होत्या, तेव्हा ओपोंग यांनी दोन वेळा त्यांच्या वॉर्डमध्ये काम करणाऱ्या ‘जॉड’ नावाच्या एका वयोवृद्ध कर्मचाऱ्याचा संदर्भ देऊन “तुम्ही दोघे एकमेकांसाठी योग्य जोडी आहात,” अशी टिप्पणी केली होती. या विधानामुळे आपल्याला अत्यंत अपमानित वाटले आणि आपल्या खासगी आयुष्यावर व वयावर केलेला हा आक्षेपार्ह विनोद होता, असा दावा एस्टेव्हेस यांनी केला. ओपोंग यांनी न्यायालयात सर्व आरोप फेटाळून लावले असले तरी, त्यांनी किमान एकदा ‘आंटी’ म्हटल्याचे मान्य केले.
न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण-
न्यायाधीश ॲलिओट यांनी आपल्या निकालात एक अत्यंत सूक्ष्म परंतु महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. ते म्हणाले की, “भारतीय किंवा आशियाई संस्कृतीत ‘आंटी’ हा शब्द वयोवृद्ध व्यक्तींप्रति आदर व्यक्त करण्यासाठी वापरला जाऊ शकतो; मात्र, जेव्हा एखादी व्यक्ती या संबोधनाला स्पष्टपणे विरोध करते आणि तरीही त्याचा वापर केला जातो, तेव्हा तो शब्द अपमानास्पद ठरतो.










