Celebi Aviation | तुर्कीमधील सेलेबी एव्हिएशन (Celebi Aviation) या विमानसेवा कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून केंद्र सरकारकडून सुरक्षा मंजुरी अचानक रद्द केल्याविरोधात आक्षेप नोंदवला आहे.
कोणतीही पूर्वसूचना अथवा सुनावणीची संधी न देता ही कारवाई केली गेली असून, ती संपूर्णपणे अनपेक्षित होती, असे कंपनीने म्हटले आहे
काही दिवसांपूर्वी ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (BCAS) ने सेलेबीची मंजुरी रद्द केली होती. ही कारवाई भारताच्या दहशतवादविरोधी मोहिमांनंतर आणि तुर्कीने पाकिस्तानला दिलेल्या सार्वजनिक पाठिंब्यानंतर झाली.
सेलेबी सध्या 9 भारतीय विमानतळांवर ग्राउंड हँडलिंग आणि कार्गो सेवा पुरवते. कंपनीकडे 10,000 पेक्षा अधिक कर्मचारी आहेत.
सेलेबीच्या भारतीय युनिटने न्यायालयात स्पष्ट केलं की, ते भारतीय कंपनी म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांचे नागरिकत्व भारतीय आहे. कोर्टात ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी हे प्रकरण मांडताना सांगितलं की, सरकारने नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे उल्लंघन केलं असून, कंपनीला बाजू मांडण्याची संधी दिलीच नाही.
रिपोर्टनुसार, रोहतगी यांनी सांगितले की, कायद्याने ‘कारणे दिलेली’ नोटीस देणं बंधनकारक आहे आणि “नियम बनवणारा अपवाद निर्माण करू शकत नाही” हे न्यायतत्त्व सरकारलाही लागू होतं.
त्यांनी सीलबंद पाकिटांमधून (sealed cover) कोर्टात कारणे देण्याच्या केंद्राच्या भूमिकेलाही विरोध केला. त्यावर रोहतगी म्हणाले, “दुसऱ्या पक्षाला अंधारात ठेवणं योग्य नाही; ही केवळ अटकळ असून, ते केवळ तुर्की नागरिकांची भागिदारी असल्याची शक्यता मांडतात.”
तसेच, केंद्र सरकारने कोर्टात सांगितले की, सेलेबी एव्हिएशनची मंजुरी रद्द करण्यामागची कारणे उघड करणे राष्ट्रहिताला आणि सार्वभौमत्वाला (हानीकारक ठरू शकते. ही माहिती देणे “प्रतिउत्पादक” ठरेल, असा दावा करण्यात आला.
सेलेबी एव्हिएशन कंपनीने याचिकेत म्हटले आहे की, मंजुरी रद्द करण्याची प्रक्रिया कायद्याच्या दृष्टीने दोषपूर्ण आणि अन्यायकारक आहे. कोणतीही स्पष्ट सुरक्षा कारणे न देता, केवळ राष्ट्रीय सुरक्षा असा अस्पष्ट हवाला दिला गेला, हे पुरेसे नाही. या निर्णयामुळे 3,791 नोकऱ्या धोक्यात येतील आणि गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत होईल, असेही कंपनी म्हटले आहे.
कंपनीने स्पष्टपणे सांगितले की, तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान यांच्या मुलगी सुमेये एर्दोगान (Sümeyye Erdoğan) यांच्याशी कोणताही संबंध नाही. मालकी सेलेबिओग्लू कुटुंबात असून, त्यांचा प्रत्येकी 17.5% हिस्सा आहे आणि त्यांचे कोणतेही राजकीय संबंध नाहीत. उर्वरित 65% मालकी आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांकडे आहे.