Chikungunya Outbreak: जगभरात ‘चिकुनगुनिया’चा पुन्हा उद्रेक; जागतिक आरोग्य संघटनेचा तातडीच्या उपाययोजनांचा इशारा

Chikungunya Outbreak

Chikungunya Outbreak: जगभरात पुन्हा एकदा चिकनगुनियाचा (Chikungunya) धोका वाढला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पुन्हा एकदा एक गंभीर आरोग्य इशारा जारी करत जगभरातील आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

दोन दशकांपूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर भीती निर्माण करणारा चिकुनगुनिया विषाणू पुन्हा एकदा वेगाने पसरत आहे. यामुळे सुमारे 119 देशांमधील 5.6 अब्ज लोक संसर्गाच्या धोक्याखाली आहेत.

हिंदी महासागरातील लहान बेटांपासून सुरू झालेला हा उद्रेक आता आग्नेय आशिया, माडागास्कर, सोमालिया, केनिया आणि युरोपमध्येही पोहोचत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने स्थितीबाबत चिंता व्यक्त केली.

मागील काही दिवसात आग्नेय आशियासह भारतातही स्थानिक पातळीवरही या आजाराचे संक्रमण दिसत आहे. 2004-2005 साली याच विषाणूमुळे मोठी साथ झाली होती. त्या काळात लाखो लोक प्रभावित झाले होते. 2025 च्या सुरूवातीलाही अशीच लक्षणे दिसत असल्याने आरोग्य तज्ज्ञ चिंतेत आहेत.

युरोपमध्ये स्थानिक संक्रमणाची चिन्हे

फ्रान्स, इटलीमध्येही या आजाराची लागण झालेले रुग्ण आढळळे आहेत. हवामानातील बदल, शहरीकरण आणि जागतिक प्रवासामुळे पूर्वी उष्णकटिबंधीय देशांपुरती मर्यादित असलेली ही साथ आता युरोपपर्यंत पोहोचत असल्याचे WHO चे निरीक्षण आहे.

डासांद्वारे पसरत असलेला धोका

चिकुनगुनिया मुख्यतः एडीस डासांद्वारे पसरतो. हे डास दिवसा चावतात आणि झिका व डेंग्यूसारखे अन्य विषाणूही पसरवतात. यामुळे संसर्गाचा धोका अधिक वाढतो.

या आजारात तीव्र ताप, सांधेदुखी यांसारखी लक्षणे दिसून येतात. काही रुग्णांमध्ये ही लक्षणे आठवडे किंवा महिन्यांपर्यंत टिकतात. विशेषतः वृद्ध आणि आधीपासून आजारी असलेल्या व्यक्तींमध्ये या विषाणूमुळे गंभीर गुंतागुंत होऊ शकते.

प्रतिबंधात्मक उपाय हाच एकमेव मार्ग

सध्या चिकुनगुनियावर कोणताही खास औषधोपचार किंवा लस उपलब्ध नसल्याने प्रतिबंध हेच प्रभावी शस्त्र ठरत आहे. WHO ने व्यक्ती आणि समाज पातळीवर खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.

मुख्य उपाययोजना:

  • कीटकनाशकाचा नियमित वापर
  • लांब बाह्यांचे कपडे व पाय झाकणारे वस्त्र परिधान करणे
  • घरात मच्छरदाण्यांचा वापर व जाळ्या बसवणे
  • घरासमोर व परिसरातील साचलेले पाणी हटवणे