China K Visa: जगभरातील तरुण आणि प्रतिभावान व्यावसायिकांनाआकर्षित करण्यासाठी चीनने एक नवीन ‘K व्हिसा’ श्रेणी सुरू करण्याची घोषणा केली आहे. प्रामुख्याने विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) या क्षेत्रांमधील तज्ञांनी आपल्या देशात आणण्यासाठी चीन प्रयत्न करत आहे.
1 ऑक्टोबर 2025 पासून हे नवीन नियम लागू होतील. अमेरिकेसह अनेक देश सध्या व्हिसा नियम अधिक कडक करत असताना चीनची ही घोषणा खूप महत्त्वाची मानली जात आहे.
China K Visa: H-1B व्हिसा आणि ‘K व्हिसा’ची तुलना
मेरिकेने नुकतीच H-1B व्हिसा अर्जासाठी 100,000 डॉलरची फी जाहीर केली आहे. यामुळे अनेक भारतीय तंत्रज्ञान व्यावसायिक आणि आयटी कंपन्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, चीनने आणलेला हा व्हिसा एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.
विश्लेषकांचे म्हणणे आहे की, चीन दक्षिण आशियातील (विशेषतः भारतीय) व्यावसायिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे, जे परदेशात पर्यायी संधी शोधत आहेत.
‘K व्हिसा’साठी पात्रता आणि वैशिष्ट्ये
चीनच्या न्याय मंत्रालयानुसार, हा व्हिसा खालील व्यक्तींसाठी खुला असेल:
- चीन किंवा परदेशातील प्रतिष्ठित विद्यापीठांमधून STEM विषयांत पदवी किंवा त्याहून अधिक शिक्षण घेतलेले तरुण वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान तज्ञ.
- अशा संस्थांमध्ये शिक्षण किंवा संशोधनाचे काम करणारे तरुण व्यावसायिक.
‘K व्हिसा’ची खास वैशिष्ट्ये:
- या व्हिसासाठी चीनमधील कोणत्याही कंपनी किंवा संस्थेकडून आमंत्रण मिळवण्याची आवश्यकता नाही, ज्यामुळे प्रक्रिया कमी क्लिष्ट होईल.
- इतर व्हिसाच्या तुलनेत, यामध्ये अनेक वेळा ये-जा करण्याची, जास्त वैधतेची आणि जास्त काळ राहण्याची सुविधा मिळेल.
- चीनमध्ये प्रवेश केल्यानंतर, ‘K व्हिसा’ धारकांना शैक्षणिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक देवाणघेवाणीसोबतच व्यवसाय आणि उद्योजकीय कामांमध्येही भाग घेण्याची परवानगी असेल.
हे देखील वाचा – लोक ChatGPT वर नेमके काय शोधतात? समोर आली माहिती