Cyclone Montha: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, ‘मोंथा’ नावाचे चक्रीवादळ आज (28 ऑक्टोबर) सकाळपर्यंत अतीतीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे.
या चक्रीवादळाचा परिणाम आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस आणू शकतो. या चक्रीवादळाला मोंथा हे नाव थायलंडने दिले आहे.
चक्रीवादळाचा मार्ग आणि धोका
हे चक्रीवादळ 28 ऑक्टोबर रोजी सायंकाळी किंवा रात्रीच्या सुमारास भारताच्या पूर्व किनाऱ्यावर आंध्र प्रदेशात काकीनाडाजवळ मछलीपट्टणम आणि कलिंगपट्टणमदरम्यान धडकण्याची शक्यता आहे. किनाऱ्यावर धडकताना वाऱ्याचा वेग ताशी 90 ते 100 किलोमीटरपर्यंत असेल आणि काही वेळा तो 110 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो.
जेव्हा एखाद्या चक्रीवादळात वाऱ्याचा वेग ताशी 88 ते 117 किलोमीटरपर्यंत पोहोचतो, तेव्हा त्याला ‘सीव्हियर सायक्लॉनिक स्टॉर्म’ म्हणजेच अतीतीव्र चक्रीवादळ म्हटले जाते.
चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकल्यानंतर विदर्भालगत छत्तीसगडच्या दिशेने पुढे सरकू शकते. त्यामुळे महाराष्ट्रात विदर्भाच्या काही भागांतही याचा परिणाम जाणवणार आहे, विशेषत: विदर्भाच्या पूर्वेकडील भागांत वादळी पावसाची शक्यता आहे. याच कारणामुळे गडचिरोली जिल्ह्यासाठी 28 ऑक्टोबरकरिता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
चक्रीवादळाच्या नावाचे महत्त्व
एकाच वेळी एका भौगोलिक ठिकाणी किंवा जगभरात अनेक चक्रीवादळे येऊ शकतात, जी आठवडाभर किंवा त्याहून अधिक काळ टिकू शकतात. त्यामुळे गोंधळ टाळण्यासाठी, आपत्कालीन व्यवस्थापन आणि धोका कमी करण्याच्या सोयीसाठी प्रत्येक उष्णकटिबंधीय वादळाला नाव दिले जाते.
‘मोंथा’ हे नाव थायलंडने सुचवले असून, याचा अर्थ ‘सुंदर किंवा सुगंधित फूल’ असा होतो.
चक्रीवादळांना नावे कशी दिली जातात?
जगभरात 6 प्रादेशिक विशेष हवामानशास्त्र केंद्रे (RSMCs) आणि 5 प्रादेशिक उष्णकटिबंधीय चक्रीवादळ सूचना केंद्रे आहेत, ज्यांना वादळांना नावे देण्याचा अधिकार आहे. भारतीय हवामान विभाग या 6 RSMCs पैकी एक आहे. IMD, जागतिक हवामान संघटना (WMO) / ESCAP पॅनेल अंतर्गत 13 सदस्य देशांना (बांगलादेश, भारत, इराण, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, कतार, सौदी अरेबिया, श्रीलंका, थायलंड, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन) चक्रीवादळाच्या सूचना पुरवते.
चक्रीवादळांच्या नावांची यादी देशांनी वर्णक्रमानुसार (Alphabetical) तयार केली असून, ती लिंग, राजकारण, धार्मिक श्रद्धा किंवा संस्कृतीबाबत तटस्थ असते. ही नावे क्रमाने वापरली जातात आणि एकदा वादळाला दिलेले नाव पुन्हा वापरले जात नाही.
या वर्षीच्या हंगामातील पहिले चक्रीवादळ ‘शक्ती’ (Shakhti) होते, जे श्रीलंकेने सुचवले होते. मोंथानंतर येणाऱ्या पुढील चक्रीवादळाला संयुक्त अरब अमिरातीने (UAE) सुचवलेले ‘सेन्यार’ हे नाव दिले जाईल. यापूर्वी काही चक्रीवादळांना शक्ती (श्रीलंका), फेंगळ (सौदी अरेबिया), दाना (कतार), आसना (पाकिस्तान) आणि रेमल (ओमान) अशी नावे देण्यात आली होती.









