Cyclone Montha – बंगालच्या (Bengal)उपसागरावर निर्माण झालेले मोंथा हे चक्रीवादळ वेगाने तीव्र होत आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीसाठी भारतीय हवामान खात्याने (IMD) रेड अलर्ट जारी केला आहे. २८ ऑक्टोबर रोजी हे वादळ काकीनाडा (Kakinada) किनारा ओलांडण्याची शक्यता आहे, त्या वेळी वाऱ्याचा वेग प्रतितास ११० किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा पश्चिम-उत्तर दिशेने सरकत आहे. आज हा पट्टा खोल दाबाच्या क्षेत्रात परिवर्तित झाला. २७ ऑक्टोबरपर्यंत तो नैऋत्य आणि पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळात (cyclonic storm) रूपांतरित होईल, तर २८ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत हे वादळ तीव्र चक्रीवादळात परिवर्तित होण्याची शक्यता आहे.
या वादळाचे केंद्र सध्या पोर्ट ब्लेअरपासून सुमारे ५५० किमी पश्चिमेला आणि विशाखापट्टणमपासून सुमारे ८९० किमी आग्नेय दिशेला आहे. पुढील ४८ तासांत हे वादळ काकीनाडा, मछलीपट्टणम आणि कलिंगपट्टणमदरम्यान किनारा ओलांडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या डॉ. मनोरमा मोहंती (Dr. Manorama)यांनी सांगितले की, २८ आणि २९ ऑक्टोबरला आंध्रप्रदेशच्या किनाऱ्यावर मुसळधार पाऊस (Rainfall), जोरदार वारे आणि समुद्रात प्रचंड खळबळ निर्माण होण्याची शक्यता आहे. तर या काळात मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये आणि समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागांतील नागरिकांनी सतर्कता बाळगावी.
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू (Chief Minister N. Chandrababu Naidu) यांनी सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि आपत्कालीन सेवांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. किनारपट्टी भागांतील (coastal )नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
हे देखील वाचा –
३० दिवसांत ग्रॅच्युइटी द्या ; अन्यथा आंदोलन करणार ! निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्यांचा इशारा
एलआयसीवर केंद्राचा दबाव; अदानीत अब्जावधीची गुंतवणूक
कोणाच्याही टेकू शिवाय ठाकरे बंधूंचाच महापौर ! संजय राऊतांचा दावा









