‘देशात समान नागरी कायदा लागू करणे गरजेचे’, माजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांचे मोठे विधान

D Y Chandrachud on UCC

D Y Chandrachud on UCC: भारताचे माजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड (D Y Chandrachud) यांनी समान नागरी कायद्याविषयी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी देशात समान नागरी कायदा (D Y Chandrachud on UCC) लागू करायला हवा, असे मत व्यक्त केले.

एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी देशाच्या संविधानाचे कौतुक केले. ते म्हणाले की, देशाला स्थिरता देणारे आणि विविध समुदाय, धर्म, प्रदेश आणि संस्कृतींना एकत्र बांधून ठेवणारे सर्वात मोठे सामर्थ्य म्हणजे आपले संविधान आहे. संविधानानेच भारताला एक राष्ट्र बनवले आहे.

काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या ‘अवर लिविंग कॉन्स्टिट्यूशन’ (Our Living Constitution) या नवीन पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या वेळी पत्रकारांशी बोलताना माजी सरन्यायाधीश म्हणाले की, गेल्या 75 वर्षांत देशाने अनेक प्रशासकीय बदल, महामारी आणि अंतर्गत तसेच बाह्य आव्हानांचा सामना केला आहे. मात्र, संविधानाचे खरे महत्त्व या वस्तुस्थितीमध्ये आहे की, त्याने देशाला मोठी स्थिरता दिली आहे.

समान नागरी कायद्याबद्दलही महत्त्वाचे विधान

इंडियाज इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनाईट नेशन्स (IIMUN) या संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी समान नागरी कायद्यावर (Uniform Civil Code) देखील आपले मत मांडले.

माजी सरन्यायाधीश म्हणाले की, संविधान समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीची इच्छा व्यक्त करते. संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, हे उद्दिष्ट साध्य करणे महत्त्वाचे आहे. पण त्याच वेळी, समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे.

‘न्याय’ या मूल्यावर आधारित भविष्यातील भारतीय समाजासाठी हे गरजेचे आहे. आजचा हा कार्यक्रम प्रत्येक नागरिकाच्या जीवनात संविधानाचे मूल्य आणि सर्वांसाठी एक चांगले भविष्य घडवण्याबद्दल आहे, असे ते म्हणाले.

“अशा प्रकारच्या चर्चा आपल्या तरुण पिढीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत, कारण तीच आपल्या समाजाची आणि राष्ट्राची आशा आणि भविष्य आहे.”, असे मत त्यांनी व्यक्त केले.