Home / देश-विदेश / Death Penalty: मृत्यूदंड देण्याच्या पद्धतीवर देशात चर्चा; ‘फाशी’ऐवजी ‘धोकादायक इंजेक्शन’चा पर्याय मिळणार?

Death Penalty: मृत्यूदंड देण्याच्या पद्धतीवर देशात चर्चा; ‘फाशी’ऐवजी ‘धोकादायक इंजेक्शन’चा पर्याय मिळणार?

Death Penalty India: देशात मृत्यूदंडाची शिक्षा देण्याच्या पद्धतीवर सध्या सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू आहे. फाशी देण्याच्या प्रचलित...

By: Team Navakal
Death Penalty

Death Penalty India: देशात मृत्यूदंडाची शिक्षा देण्याच्या पद्धतीवर सध्या सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू आहे. फाशी देण्याच्या प्रचलित पद्धतीऐवजी कैद्याला कमी वेदना देणारा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने केंद्र सरकारच्या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त केले.

‘धोकादायक इंजेक्शन’ (Lethal Injection) हा पर्याय देणे ‘व्यवहार्य नसेल’ असे मत सरकारने मांडले होते. यावर, “काळानुसार गोष्टी बदलत असताना सरकारमध्ये बदल स्वीकारण्याची तयारी दिसत नाही,” असे निरीक्षण न्यायमूर्तींनी नोंदवले.

Death Penalty India: फाशी देणे क्रूर आहे?

या याचिकेद्वारे फाशीची पद्धत कायद्यातून काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकाकर्ते ज्येष्ठ वकील ऋषी मल्होत्रा यांनी न्यायालयाला सांगितले की, ‘फाशी’ ही ‘अत्यंत वेदनादायक, अमानुष आणि क्रूर’ पद्धत आहे. यात कैद्याचे शरीर सुमारे 40 मिनिटे दोरीवर लटकलेले राहते. हा प्रकार भारतीय संविधानातील अनुच्छेद 21 नुसार असलेल्या ‘सन्मानाने मरण्याच्या अधिकारा’ (Right to Dignified Death) चे उल्लंघन करतो.

मल्होत्रा यांनी ‘लेथल इंजेक्शन’ हा फाशीपेक्षा ‘जलद, मानवीय आणि सभ्य’ पर्याय असल्याचे सांगितले. अमेरिकेतील 50 पैकी 49 राज्यांनी लेथल इंजेक्शनची पद्धत स्वीकारल्याचे उदाहरण त्यांनी दिले. कैद्याला फाशी किंवा इंजेक्शन यापैकी एक पर्याय निवडण्याची मुभा तरी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.

केंद्र सरकारची भूमिका आणि पुढील सुनावणी:

यापूर्वी, सरकारने फक्त फाशीच्या शिक्षेलाच पाठिंबा दिला होता, कारण इतर पर्याय कमी वेदनादायक नाहीत, असे त्यांचे मत होते. मात्र, आता न्यायालयाने या विषयावर विचार करण्याचे निर्देश दिल्यानंतर, या पद्धतीचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेल्या समितीच्या स्थितीबद्दल माहिती देऊ, असे केंद्राच्या वकिलांनी सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

Death Penalty: जगात इतर पर्याय कोणते आहेत?

जगात अजूनही सुमारे 50 देशांमध्ये मृत्यूची शिक्षा कायदेशीर आहे. अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी जगात फाशी, लेथल इंजेक्शन, गोळी घालणे, शिरच्छेद आणि नायट्रोजन गॅस ॲस्फिक्सिएशन यांसारख्या पद्धतींचा वापर करण्यात आला.

अनेक आशियाई देशांमध्ये (भारत, जपान, मलेशिया) आजही फाशी दिली जाते, तर अमेरिका, चीन आणि व्हिएतनाममध्ये लेथल इंजेक्शन वापरले जाते.

हे देखील वाचा गेमर्ससाठी खास संधी! भारतात होणार BGMI International Cup 2025 स्पर्धा; 1 कोटी जिंकण्यासाठी 16 संघ मैदानात

Web Title:
संबंधित बातम्या