Delhi Blast : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटामागे आत्मघाती हल्लेखोर उमर उन नबी याने चालवलेल्या ‘वाहनात केलेले इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (IED)’ असल्याचे निश्चित केले आहे. या प्रकरणातील त्याच्या कथित सहकाऱ्याला अटक करून NIA ने तपासात मोठे यश मिळवल्याची घोषणा केली आहे.
NIA ने जम्मू-काश्मीरमधील संबूरा, पंपोर येथील रहिवासी आमिर रशीद अली याला अटक केली आहे. 13 लोकांचा बळी घेणाऱ्या आणि 30 हून अधिक लोकांना जखमी करणाऱ्या या हल्ल्याचा कट रचण्यात अलीचा सहभाग होता. स्फोटासाठी वापरलेली कार आमिरच्या नावावर नोंदणीकृत होती. रिपोर्टनुसार, हे वाहन IED मध्ये रूपांतरित करण्यापूर्वी ते खरेदी करण्यासाठी अली दिल्लीला आला होता.
हल्लेखोर प्राध्यापकाची ओळख
फॉरेन्सिक तपासणीत मृत चालकाची ओळख डॉ. उमर उन नबी अशी पटली आहे. तो पुलवामा जिल्ह्यातील रहिवासी असून फरिदाबादमधील अल फलाह विद्यापीठात जनरल मेडिसिन विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत होता. NIA ने नबीचे दुसरे वाहनही जप्त केले असून, त्यातील पुराव्यांची तपासणी सुरू आहे.
तपासातील इतर महत्त्वाचे मुद्दे
दरम्यान, या स्फोटाच्या संदर्भात नूह, हरियाणा येथे ताब्यात घेतलेल्या 4 व्यक्तींना (ज्यात 3 डॉक्टरांचा समावेश होता) NIA ने सोडून दिले आहे. डॉ. रेहान, डॉ. मोहम्मद, डॉ. मुश्ताकीम आणि खत विक्रेता दिनेश सिंगला यांना मुख्य आरोपी डॉ. उमर उन नबी यांच्याशी कोणताही ठोस संबंध नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सोडण्यात आले. हे डॉक्टर पूर्वी उमरच्या संपर्कात होते आणि अल फलाह विद्यापीठाशी संबंधित होते.
NIA ने आतापर्यंत जखमींसह 73 साक्षीदारांची चौकशी केली आहे. दिल्ली पोलीस, जम्मू-काश्मीर पोलीस, हरियाणा पोलीस, उत्तर प्रदेश पोलीस आणि इतर यंत्रणांच्या मदतीने तपास अनेक राज्यांमध्ये सुरू आहे. हल्ल्यामागील मोठा कट उघडकीस आणणे आणि त्यात सामील असलेल्या सर्व व्यक्तींना ओळखणे हे NIA चे मुख्य लक्ष्य आहे.
हे देखील वाचा –
सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर असलेले खा. राऊत स्टार प्रचारक









