Delhi Blast : दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाच्या (Bomb Blast) घटनेनंतर तपास यंत्रणांच्या चौकशीत नाव जोडले गेलेल्या फरीदाबाद (हरियाणा) येथील अल-फलाह विद्यापीठावर (Al-Falah University) मोठी कारवाई झाली आहे. असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजने (AIU) या विद्यापीठाची सदस्यता तत्काळ प्रभावाने रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
AIU ने विद्यापीठाच्या कुलपतींना एक पत्र पाठवून याची माहिती दिली. प्रोफेसर भुपिंदर कौर आनंद यांच्या नावाने पाठवलेल्या पत्रात AIU ने स्पष्ट केले की, कोणतेही सदस्य विद्यापीठ हे ‘चांगल्या स्थितीत’ असणे अनिवार्य आहे. मात्र, मीडिया रिपोर्ट आणि अलीकडील घटनांच्या आधारावर अल-फलाह विद्यापीठ हे निकष पूर्ण करत नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे संघटनेची प्रतिष्ठा आणि मानके कायम ठेवण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे.
AIU च्या लोगो आणि नावाच्या वापरावर बंदी
सदस्यता रद्द झाल्यामुळे अल-फलाह विद्यापीठाला आता AIU चे नाव किंवा लोगो त्यांच्या कोणत्याही प्रचारात्मक किंवा शैक्षणिक गतिविधींमध्ये वापरता येणार नाही. AIU ने विद्यापीठाला त्यांच्या अधिकृत वेबसाइट्स आणि सर्व प्रचार सामग्रीतून AIU चा लोगो त्वरित काढून टाकण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
चौकशीच्या फेऱ्यात विद्यापीठाचे डॉक्टर्स
दिल्ली बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर केंद्रीय तपास यंत्रणांनी अल-फलाह विद्यापीठाशी संबंधित अनेक डॉक्टर्सना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्यांमध्ये डॉ. उमर उन नबी, डॉ. शाहिद, डॉ. निसार-उल-हसन आणि डॉ. मुजम्मिल यांचा समावेश आहे. या दहशतवादी हल्ल्याशी संबंध असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे. सदस्यता रद्द झाल्याने, अल-फलाह आता AIU च्या मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या यादीतून बाहेर झाले आहे. याशिवाय, विद्यापीठाच्या वेबसाइटवरील अभ्यासक्रमांच्या चुकीच्या माहितीमुळे ते स्वतंत्रपणे चौकशीच्या कक्षेत आले आहे.
हे देखील वाचा – Pune News: नवले पुलावर भीषण दुर्घटना; 8 जणांचा मृत्यू, देवेंद्र फडणवीसांनी 5 लाख रुपये रुपयांची मदत केली जाहीर









