Republic Day : 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीच्या आकाशात जेव्हा भारतीय हवाई दलाची लढाऊ विमाने आपली ताकद दाखवतील, तेव्हा जमिनीवर एक अत्यंत महत्त्वाची आणि शांत मोहीम राबवली जात असेल.
आकाशात घिरट्या घालणाऱ्या घारी विमानांच्या मार्गात येऊ नयेत आणि ‘बर्ड हिट’चा धोका टळावा, यासाठी दिल्ली सरकारचा वन आणि वन्यजीव विभाग तब्बल 1,275 किलो बोनलेस चिकनचा वापर करणार आहे.
नेमका प्लॅन काय आहे?
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात आणि सरावादरम्यान आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना विमानांच्या मार्गापासून दुसरीकडे आकर्षित करण्यासाठी त्यांना मांस खायला दिले जाते. या वर्षी प्रथमच म्हशीच्या मांसाऐवजी चिकनचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मोहीम हवाई दलाच्या समन्वयाने राबवली जाते.
- एकूण गरज: संपूर्ण मोहिमेसाठी अंदाजे 1,275 किलो बोनलेस चिकन वापरले जाईल.
- ठिकाणे: दिल्लीतील 20 वेगवेगळ्या ठिकाणांवर दररोज हे मांस पक्ष्यांसाठी टाकले जाईल.
- प्रमाण: प्रत्येक ठिकाणी सुमारे 20 किलो मांस दिले जाईल. म्हणजेच दिवसाला सुमारे 400 किलो मांसाचा वापर होईल.
- तपशील: पुरवठादाराला हे मांस 20 ते 30 ग्रॅमच्या छोट्या तुकड्यांमध्ये आणि 5 किलोच्या पाकिटांमध्ये द्यावे लागणार आहे.
बदल आणि खर्च
रिपोर्टनुसार, बोनलेस चिकनचा दर सुमारे 350 रुपये प्रति किलो आहे. या हिशोबाने 1,275 किलो चिकनसाठी सरकारला सुमारे 4.46 लाख रुपये खर्च करावा लागू शकतो. अर्थात, मोठ्या प्रमाणात खरेदी करताना हा दर कमी-जास्त होऊ शकतो.
विमानांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची पावले
कमी उंचीवरून उडणाऱ्या विमानांसाठी पक्ष्यांशी होणारी धडक अत्यंत घातक ठरू शकते. या ‘बर्ड स्ट्राईक’मुळे विमानांचे इंजिन निकामी होऊन मोठा अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे पक्ष्यांना विमानांच्या उड्डाण मार्गापासून दूर ठेवण्यासाठी ही ‘मीट फीडिंग’ एक्सरसाइज दरवर्षी अत्यंत गांभीर्याने पार पाडली जाते.
हे देखील वाचा – Dr Sangram Patil: डॉ. संग्राम पाटील यांची पोलिसांकडून १५ तास चौकशी; नेमक्या कोणत्या पोस्टमुळे केली होती तक्रार?









